‘जलसंधारण’ची परीक्षा रद्द करून एसआयटी चौकशी करा, युवक काँग्रेस आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 19:34 IST2024-03-01T19:27:05+5:302024-03-01T19:34:20+5:30
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा कचेरीसमोर ठिय्या देत शासनविरोधी घोषणा दिल्या व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिले.

‘जलसंधारण’ची परीक्षा रद्द करून एसआयटी चौकशी करा, युवक काँग्रेस आक्रमक
अमरावती : परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याने मृदा व जलसंधारण विभागाची जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) ६७० जागांची भरती परीक्षा रद्द करण्यात यावी व गैरप्रकार झाला आहे त्याची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसद्वारा शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा कचेरीसमोर ठिय्या देत शासनविरोधी घोषणा दिल्या व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिले. दि. २१ फेब्रुवारीला ड्रीमलँड येथील ए.आर.एन. असोसिएट या परीक्षा केंद्रावर या परीक्षेकरिता पेपर झाला. या केंद्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आलेला आहे. गरीब, होतकरू, रात्रंदिवस प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत हा अन्याय आहे.
परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी सतत संशयाच्या भोवऱ्यात असलेले सदर सेंटर देण्यात येऊ नये याकरिता परीक्षार्थींनी जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव यांना ई-मेलद्वारे मागणी केली होती. मात्र सचिवांनी हे सेंटर न बदलता उलटपक्षी पारदर्शकतेची हमी दिली होती. त्यामुळे संपूर्ण विभाग या पेपरफुटीमध्ये सहभागी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, समीर जवंजाळ, सागर कलाने, अनिकेत ढेंगळे, प्रसाद भगत, अक्षय साबळे, आकाश गेडाम, संकेत साहू, संकेत भेंडे, कौस्तुभ देशमुख, आकाश खडसे, आमिर शेख, श्रेयस धर्माळे, शुभम बांबल, अमेय देशमुख, चैतन्य गायकवाड व पदाधिकारी उपस्थित होते.