कोराना असल्याचा फोन आला नि अवघडलेल्या स्त्रीची डॉक्टरांनी प्रसूती नाकारली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:37 IST2020-09-26T16:34:14+5:302020-09-26T16:37:46+5:30
नऊ महिने ज्या डॉक्टरांकडे उपचार घेतला, त्या डॉक्टरांनी प्रसववेदना सुरू झालेल्या २३ वर्षांच्या विवाहितेला ऐनवेळी उपचार नाकारून अतिविशेषोपचार रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

कोराना असल्याचा फोन आला नि अवघडलेल्या स्त्रीची डॉक्टरांनी प्रसूती नाकारली!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नऊ महिने ज्या डॉक्टरांकडे उपचार घेतला, त्या डॉक्टरांनी प्रसववेदना सुरू झालेल्या २३ वर्षांच्या विवाहितेला ऐनवेळी उपचार नाकारून अतिविशेषोपचार रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. अवघडलेल्या महिलेला नातेवाइकांनी अखेरीस डफरीनमध्ये हलविले. तिला मुलगा झाला. तुम्ही कोराना पॉझिटिव्ह आहात, असा निरोप देणाऱ्या एका फोन कॉलने हा सारा प्रकार घडला.
भारती रोशन साहू (२३, रा. मसानगंज) यांना डॉक्टर कल्पना राठी यांचा इलाज सुरू होता. गुरुवारी त्यांना प्रसवकळा सुरू झाल्या. पती रोशन यांनी पत्नीला दुपारी २ च्या सुमारास डॉ. कल्पना राठी यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. कोराना निगेटिव्ह असल्याचे रॅपिड अँटिजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी अहवाल त्यांच्याकडे होते.
डॉ. राठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती यांना ओपीडीमध्ये प्रवेश दिला गेला. काही वेळाने भारती यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. समोरची व्यक्ती काय बोलते आहे, हे कळत नसल्यामुळे भारती यांनी तो फोन परिचरिकेला दिला. मी इर्विनमधून बोलतो. संबंधित महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे, असे पलीकडून बोलणाºयाने सांगितले. परिचारिकेने ही माहिती डॉक्टर कल्पना राठी यांना दिली. त्यामुळे डॉक्टरांनी भारती यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जाण्यास सांगितले.
लेखी रिपोर्ट निगेटिव्ह
दरम्यान, भारतीचे पती आणि नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे भारती यांना कोरोना नसल्याचे रॅपिड अँटिजेन आणि आरटी-पीसीआर चाचणीचे लेखी अहवाल आहेत. त्यांनी डॉक्टरांना त्याचा हवाला दिला. नऊ महिने तुमची वैद्यकीय सेवा घेतल्यावर ऐनवेळी अवघडलेल्या स्थितीत आम्हाला इलाज नाकारू नका. बाळ-बाळंतिणीला धोका होऊ शकेल, अशी विनंती केली. डॉक्टरांनी पुन्हा कोराना चाचणी करण्यास सांगितले. ती निगेटिव्ह आली तरच इलाज करू, अशी भूमिका घेतली. ऐनवेळी चाचणी करायची कशी, असा प्रश्न पडल्याने नातेवाइकांनी ह्यत्याह्ण फोनवर चाळीसेक वेळा कॉल केले. तिकडून प्रतिसाद दिला गेला नाही. अखेरीस नातेवाइकांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गाठले. अधीक्षक डॉ. तुलसीदास भिलावेकर यांना घडला प्रकार सांगितला. त्यांनी कोविड निगेटिव्ह अहवालावर 'रिपोर्ट निगेटिव्ह असल्यामुळे भरती करण्यास हरकत नसावी' असे स्वाक्षरीनिशी लिहून दिले. तो अहवाल नातेवाईकांनी डॉ. राठी यांना दाखवून प्रसूती करण्याची विनंती केली. डॉक्टर राठी यांनी 'रेफर टू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल' असा शेरा त्या अहवालावर लिहून भूमिका कायम ठेवली. कोराना नसल्याचा लेखी चाचणी अहवाल असूनही तो फोन काम करून गेला. तीन-चार तासांची धावाधाव व्यर्थ गेली. सारे पर्याय बंद झाले. अखेरीस भारती यांना नातेवाइकांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविले. काही वेळानंतर भारती यांची 'नॉर्मल' डिलिव्हरी झाली. त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. १८ सदस्यांच्या साहू यांच्या एकत्र कुटुंबात १९ वा सदस्य आला.
पोलीस तक्रार
ज्या फोनमुळे इतका त्रास झाला, त्या फोन क्रमांकधारकाविरुद्ध साहू कुटुंबीयांनी २४ रोजी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचे लोकमतला सांगितले. डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई न्यायालयातून करू, अशी भूमिका साहू कुटुंबीयांची आहे.
मी त्या रुग्णाला रुग्णालयात प्रवेश दिला. ठोक्यांची चाचणीही केली. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा फोन आल्यामुळे नियमानुसार पुढील उपचार नाकारले. माझ्या रुग्णालयातील रुग्णांना आणि आम्हा सर्वांना त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता होती. मीसुद्धा दम्याची रुग्ण आहे.
डॉ.कल्पना राठी, स्त्रीरोगतज्ज्ञ, राजापेठ, अमरावती
डॉ. राठी यांच्याकडे नियमित इलाज घेतला. तरीदेखील लेखी अहवालावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. उलट ज्या क्रमांकाची खातरजमाही होत नाही, अशा अज्ञात फोनवर विश्वास ठेवला. प्रसूती नाकारली. बाळ आणि आईला धोका निर्माण केला. हा विषय जीवन-मरणाशी संबंधित होता. आम्ही डॉक्टरांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
साहू कुटुंबीय, अमरावती