वाघिणीच्या शोधात ज्ञानगंगातून सी-वन वाघ बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:54+5:302021-03-17T04:14:54+5:30

औरंगाबादपासून अंबाबरवापर्यंत हाय अलर्ट, १७० ट्रॅप कॅमेऱ्यांसह शोधपथक तैनात अनिल कडू परतवाडा : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून बुलडाणा जिल्ह्यातील ...

C-One tiger disappears from Gyanganga in search of Waghini | वाघिणीच्या शोधात ज्ञानगंगातून सी-वन वाघ बेपत्ता

वाघिणीच्या शोधात ज्ञानगंगातून सी-वन वाघ बेपत्ता

औरंगाबादपासून अंबाबरवापर्यंत हाय अलर्ट, १७० ट्रॅप कॅमेऱ्यांसह शोधपथक तैनात

अनिल कडू

परतवाडा : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल सी-वन वाघ काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला आहे. डिसेंबरपासून त्याचे लोकेशन मिळालेले नाही.

सी-वन वाघाचा शोध घेण्याकरिता वन्यजीव विभागाने औरंगाबाद अजिंठ्यापासून अकोटमधील अंबाबरवापर्यंत हाय अलर्ट जारी केला आहे. त्याला शोधण्याकरिता ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. १७० ट्रॅप कॅमेरे त्याचा शोध घेत आहेत. सी-वन वाघाच्या संभाव्य भ्रमंती मार्गावरील ज्ञानगंगाबाहेरील वन व वन्यजीव अधिकाऱ्यांना सी-वन कुणालाही दिसल्यास त्याची माहिती देण्यास सुचविण्यात आले आहे. गस्त वाढविण्यात आली आहे. जवळपास १४ महिन्यांत ३ हजार १७ किलोमीटरचा प्रवास करीत काही महिन्यांपूर्वी हा सी-वन वाघ अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला. तेथे तो स्थिरावला. टिपेश्वर अभयारण्यातील वयात आलेल्या या सी-वन वाघाला टिपेश्वरमध्येच फेब्रुवारी २०१९ मध्ये रेडिओ कॉलर लावण्यात आला होता. हा रेडिओ कॉलर काही दिवसांपूर्वीच काढला गेला. आता रेडिओ कॉलर नसल्यामुळे त्याचे लोकेशन मिळणेच बंद झाले आहे.

दरम्यान, टिपेश्वरमधून ज्ञानगंगात दाखल सी-वन वाघाला वाघीण मिळावी म्हणून खासदार प्रताप जाधवांसह लोकप्रतिधींनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न चालवले. वाघिणीच्या शोधात असलेल्या या सी-वन वाघाला ज्ञानगंगातच जोडीदार मिळावा, याकरिता एक अभ्यास समिती २६ मार्च २०२० रोजी गठित केली गेली. अभ्यास समितीसह वन्यजीव विभागानेही सी-वन वाघाकरिता ज्ञानगंगात वाघीण सोडण्याबाबत शिफारस केली. पण, त्याला वाघीण पुरविली गेली नाही. अखेर तो सी-वन वाघ ज्ञानगंगातूनच बेपत्ता झाला आहे. ज्ञानगंगा सोडण्याचा निर्णय त्याने वाघिणीच्या शोधार्थ घेतल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, तीन हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून ज्ञानगंगात दाखल सी-वन वाघाला ‘वॉकर’ असे नाव दिले गेले. यापूर्वी २०१६ मध्ये जय नावाचा वाघ उमरेड-कन्हान मधून बेपत्ता झाला आहे. त्याचा अजूनही शोध लागलेला नसतानाच ज्ञानगंगातून वॉकर बेपत्ता झाल्यामुळे अनेक तर्क-वितर्क वर्तविल्या जात आहे.

कोट

ज्ञानगंगा अभयारण्यात आज सी-वन वाघाचे लोकेशन नाही. अन्य क्षेत्रातील त्याच्या लोकेशन विषयी माहिती नाही.

- एम.एस. रेड्डी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती

कोट

ज्ञानगंगा अभयारण्यातून बेपत्ता सी-वन वाघाचा शोध घेतला जात आहे. त्याकरिता १७० ट्रॅप कॅमेरे लावले गेले असून, गस्तही वाढविण्यात आली आहे. वाघिणीच्या शोधार्थ तो ज्ञानगंगातून बाहेर पडला असावा.

- एम.एन. खैरनार, विभागीय वनअधिकारी, अमरावती

---------------

Web Title: C-One tiger disappears from Gyanganga in search of Waghini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.