बसच्या प्रवाशांनी बुजविले रस्त्यावरील खड्डे; खंडवा-इंदूर मार्गातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:59 AM2020-11-19T11:59:53+5:302020-11-19T12:00:23+5:30

Amravati News परतवाड्याहून धारणीमार्गे खंडवा-इंदूर या राज्य महामार्ग क्रमांक ६ वरील खड्डे बुजवून खासगी बसच्या प्रवाशांसह चालक-वाहकाने पुढील प्रवासाला सुरुवात केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला.

Bus passengers fill potholes; Incident on Khandwa-Indore route | बसच्या प्रवाशांनी बुजविले रस्त्यावरील खड्डे; खंडवा-इंदूर मार्गातील घटना

बसच्या प्रवाशांनी बुजविले रस्त्यावरील खड्डे; खंडवा-इंदूर मार्गातील घटना

Next
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

 पंकज लायदे
    लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : परतवाड्याहून धारणीमार्गे खंडवा-इंदूर या राज्य महामार्ग क्रमांक ६ वरील खड्डे बुजवून खासगी बसच्या प्रवाशांसह चालक-वाहकाने पुढील प्रवासाला सुरुवात केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला १३ नोव्हेंबर रोजी या नागरिकांचे अकल्पित श्रमदान झाले. या महत्त्वाच्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, राज्य महामार्ग क्र. ६ हा घाटवळणाचा आणि  मेळघाटच्या जंगलामधून गेला आहे. हा परिसर जंगलव्याप्त असल्यामुळे दोन वर्षांत जंगलात  कोसळलेल्या जोरदार पावसामुळे परतवाडा-धारणी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे आहेत. यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली. काही ठिकाणी खड्ड्यांनी रस्त्याची चाळण केली असल्याने नागरिकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह अचलपूर, चिखलदरा, धारणी उपविभागांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

खासगी बसचे चालक  राशीद खां, वाहक विक्की सरोदे, प्रवाशांमध्ये पोलीस कर्मचारी राजू सोनवणे,  प्रकाश नंदवंशी, राजा ठाकूर, बबलू शरीफ, दयाल बेलकर, शे. कय्यूम, जुगल गाडेराव यांच्यासह अनेकांनी बस थांबवून दगड-मातीने अनेक मोठे खड्डे बुजविले. त्या बुजविलेल्या खड्ड्यांवरून आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी व मेळघाटातील स्थानिक पदाधिकारी सुखरूप प्रवास करायला लागले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गर्भवती मातांसह रुग्णांचे प्राण कंठाशी 
ग्रामीण भागातील गर्भवती माता व इतर रुग्णांना उपचारार्थ अमरावतीकडे नेताना या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो. दरम्यान झटके सहन करावे लागतात. प्रवासात वेळ अधिक जात असल्याने रुग्णांना तातडीने उपचार मिळत नाहीत. अनेक गर्भवती मातांवर खड्ड्यांमुळे जंगलातच प्रसूतीचा प्रसंग ओढवला, तर अनेकींना जीव गमवावा लागला आहे.

रस्त्याच्या मधोमध खड्डे असल्यामुळे वाहनांचे मेन पट्टे वारंवार तुटतात. या कारणाने अपघात होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे शुक्रवारी बस थांबवून प्रवासी व आम्ही दगड-माती भरून खड्डे बुजविले. 
- अब्दुल रशीद, वाहनचालक

Web Title: Bus passengers fill potholes; Incident on Khandwa-Indore route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.