फोटो - राजुरा बाजार २६ पी
राजुरा बाजार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १८० दिवसांपासून लोकडाऊन असलेला बैलबाजार गुरुवारी पुन्हा सुरळीत सुरू होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
ब्रिटिश काळापासून दर गुरुवारी भरणारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बैलबाजारासाठी राजुरा येथील प्रसिद्ध आहे. सहा महिन्यांपासून बैल खरेदी-विक्रीचे व्यवहार लॉकडाऊनमध्ये लागलेल्या प्रतिबंधामुळे खोळंबून होते. खरिपाच्या हंगामातही बैल व इतर जनावरे खरेदी-विक्री होत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा झाली होती. शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली होती. अखेर जिल्हा प्रशासनाने नवीन परिपत्रक काढून बैल बाजार भरण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या अटीवर अनुमती दिली. १६ एकर जागेवर विस्तीर्ण व दरवर्षी लाखोंचे उत्पन्न असलेल्या बैलबाजारावर जिल्हा परिषद व वरूड कृषिउत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण आहे. येथील बैल खरेदी-विक्रीकरिता नागपूर, वर्धा, बैतूल, छिंदवाडा, मध्य प्रदेश तसेच इतर राज्यांमधून शेतकरी येत असतात. बैलजोडीला किंमत ५० हजारांपासून दोन लाखांवरही असते. यावर्षी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता दोन वर्षांच्या तुलनेत खरेदीदार फारसे बैलबाजाराकडे फिरकले नाहीत. इतरही जनावरांची खरेदी-विक्री येथे होत असते.
--------------------
जिल्हा प्रशासनाने बैल बाजाराला परवानगी दिली, हा निर्णय दिलासादायक आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लाखोंचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प होते. परंतु, पोळ्यानंतर बैल खरेदी-विक्रीस वेग येईल.
--शिवहरी गोमकाळे, शेतकरी, राजुरा बाजार