केबल तोडल्याने बीएसएनएल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:40 IST2018-06-09T22:40:58+5:302018-06-09T22:40:58+5:30
चौधरी चौकातील सिमेंट रस्त्याच्या बांधकामात बीएसएनएल केबल तोडल्यामुळे शनिवारी सकाळपासूनच इंटरनेटसह दूरध्वनी सेवा पूर्णपणे ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत जेसीबीच्या साहाय्याने केबल तोडल्याचा आरोप बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

केबल तोडल्याने बीएसएनएल ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चौधरी चौकातील सिमेंट रस्त्याच्या बांधकामात बीएसएनएल केबल तोडल्यामुळे शनिवारी सकाळपासूनच इंटरनेटसह दूरध्वनी सेवा पूर्णपणे ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत जेसीबीच्या साहाय्याने केबल तोडल्याचा आरोप बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. केबल तुटल्यामुळे अर्धे अमरावती शहर, संपूर्ण ग्रामीण भागासह यवतमाळ व अकोला शहरातील बीएसएनएल सेवा ठप्प झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
चौधरी चौक ते विलासनगरपर्यंत सिमेंट रस्त्यातील मोठ्या नालीवर स्लॅब टाकण्याचे काम शुक्रवारी सुरू होणार होते. त्यासाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना जमिनीतून गेलेले बीएसएनएलचे केबल तुटले. केबल तुटताच बीसएसएनएलची इंटरनेट, मोबाइल, लँडलाइनची सेवा अचानक बंद पडली. ही बाब कळताच बीसएसएनएल सहायक महाप्रबंधक संतोष गांधी, उपमहाप्रबंधक प्रमोद धोबे, प्रधान महाप्रबंधक एस.के. अग्रवाल, उपविभागीय अभियंता सतीश काळमेघ, सहायक महाप्रबंधक पी.आय. दातीर, सचिन कावळे, पी.एस. कांडलकर, वंजारी आदी अधिकाऱ्यांनी चौधरी चौकात धाव घेतली. अधिकाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करीत कंत्राटदार व संबंधित अधिकाºयांना जाब विचारला. बीएसएनएल अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन ठाणेदारांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार दिलीप पाटील यांनीही घटनास्थळाला भेट दिली.
बीएसएनएलविरुद्ध पीडब्ल्यूडी
सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वीच दोन्ही विभागांची केबल शिफ्ट करण्याविषयी चर्चा झाली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नाही. शनिवारी दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांमध्ये केबल तोडल्यावरून तू-तू, मै-मैची स्थिती निर्माण झाली होती. बीएसएनएलविरुद्ध पीडब्ल्यूडीची स्थिती पाहायला मिळाली.
खासगी कंपन्यांचे केबल शाबूत
बांधकामस्थळी बीएसएनएलच्या केबल तुटलेल्या, तर खासगी कंपन्यांचे केबल शाबूत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून पीडब्ल्यूडीने कंत्राटदारामार्फत मुद्दामच केबल तोडल्या. तसे नसते तर खासगी कंपन्यांचे केबल सुरक्षित राहिले कसे, असा सवाल बीएसएनएल अधिकाºयांनी उपस्थित केला.