एक दिवा त्यांच्या दारी, मिळो जगण्याला उभारी
By Admin | Updated: October 22, 2014 23:10 IST2014-10-22T23:10:40+5:302014-10-22T23:10:40+5:30
‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असा दिवाळी सण उत्साहात गुरुवारी साजरा केला जाणार आहे. निवडणुकीचा पोळा फुटताच झाले गेले विसरून प्रत्येक घरी दिवाळीची लगबग सुरू झाली आहे.

एक दिवा त्यांच्या दारी, मिळो जगण्याला उभारी
पुढाकार घेण्याची गरज : वंचितांच्या वाट्याला येईल का रोषणाई?
गजानन मोहोड - अमरावती
‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असा दिवाळी सण उत्साहात गुरुवारी साजरा केला जाणार आहे. निवडणुकीचा पोळा फुटताच झाले गेले विसरून प्रत्येक घरी दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. परंतु असेही काही परिवार आहेत जिथे निरव शांतता आहे.
शोषित, वंचितांच्या घरात दिवाळीची पणती पेटण्याचीही स्थिती नाही. गावकुसाबाहेरील पाल (प्लास्टिकच्या किंवा तुराटीची राहुटी) उभारुन राहणाऱ्या शेकडो झोपड्यांमध्ये, पालांमध्ये दिवाळीची एक पणतीही पेटण्याची स्थिती नाही. जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत असणाऱ्या या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश पोहोचला नाही.
इतर लोक साजरी करतात ती दिवाळी पहायची, याला म्हणतात दिवाळी ही अनुभवाची अशी स्थिती आहे. या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश केव्हा पोहोचणार यासाठी समाजमन जागृत होण्याची गरज आहे. यासाठीच पुढाकार घेण्याची गरज आहे.
‘वंचित’ अन् ‘उपेक्षांच्या गर्तेत’ हेलकावे घेणाऱ्या भटक्यांच्या हजारो पालांमध्ये, गावकुसाबाहेरील वस्त्यांमध्ये गोडधोड तर दूरच; साधी पणतीही दोन दिवसांमध्ये पेटली नाही. स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतर या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश स्वप्नवत आहे.
अन् दिवाळीही होईल हसरी
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये अनेक मोठ्या गावांच्या आधाराने जीवन जगणाऱ्या व पोटासाठी रानोमाळ भटकणाऱ्या फिरत्यांच्या परिवारात दिवाळीचा प्रकाश पोहोचणे सुतरामही शक्यता नाही. भटक्यांसाठी दिवाळी येते आणि जाते. ती कधीच साजरी केली नाही. नवीन कपडे तर दूरच अंगभर कपडेही घालायला मिळत नाही.
चटणी-भाकर हेच मिष्ठान्न त्यांना गोड मानून समाधान मानावे लागते. अभ्यंगस्रान, औक्षण, गोडधोड अन् रूचकर फराळ फार लांबची गोष्ट. समाजाची अशी विपरीत परिस्थिती आजची आहे. एकीकडे लख्ख प्रकाशाच्या दीपमाळा तर दुसरीकडे काळाकुट्ट अंधार अशा विरोधाभासात जिल्ह्यातील अनेक गावांत दिवाळी साजरी होत आहे. यासाठी मनाचा एक कोपरा व वंचितांच्या तंबूपर्यंत प्रकाश पोहचविण्यात यशस्वी ठरला तरी खूप काही भरून पावल्यासारखे होईल.
दिवाळीच्या सणाची प्रतीक्षा लहान-थोरांपासून सर्वांनाच असते. दिवाळी जसजशी जवळ येते तसतशी नवनवीन वस्तू खरेदी, कामाची लगबग घराच्या साफसफाईपासून रंगरंगोटीपर्यंत तयारीला सुरूवात होते. परंतु ज्यांना घर नाही, जे रस्त्याच्या कडेला राहतात किंवा गावकुसाबाहेरील पाल बांधून राहतात, त्यांचे काय? ज्यांच्यासाठी जमीन हे अंथरून अन् आकाश हे पांघरून असते तेथे पाल उभारून त्यात ते कसेतरी जीवन कंठतात. त्यांच्यासाठी दिवाळीचा दिवसही इतर दिवसांसारखा. अभ्यंगस्रान, सुगंधी उटणे, खूप दूरची गोष्ट. कित्येक दिवस अंगाला पाणी लागत नाही, हे वास्तव आहे.
या वंचितांच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी समाजानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने समाजऋणाची उतराई म्हणून एका वंचिताच्या जीवनातील एक कोपरा जरी प्रकाशमान केला तरी कित्येकाच्या जीवनात आनंद फुलू शकेल, त्यांची दिवाळीदेखील हसरी होईल, प्रकाशमान होईल.
या शोषित, वंचितांच्या जीवनातही दिवाळीचा प्रकाश येऊ शकेल.
हजारो वंचितांच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलू शकेल. यासाठी समाजातील प्रत्येक पांढरपेशाने आपल्या मनाचा एक बंद कोपरा खुला करायला हवा. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मुलांसाठी नवीन कपडे घेताना एखादा ड्रेस घेता येऊ शकतो, मुलांसाठी फटाक्याची खरेदी करताना त्यातील चारदोन फटाके वेगळे काढता येऊ शकतात. गोडधोड पदार्थापैकी त्यांच्यासाठी नक्कीच वेगळे काढता येऊ शकते. आपल्या घरात दिव्यांची आरास रचताना, रोषणाई करताना त्या पालाच्या तोंडाशी चार दोन पणत्या नक्की आणि निश्चितच लावता येऊ शकतात. सामाजिक बांधिलकीची भावना विविध संस्था, संघटना, संवेदनशील आणि दानशूर व्यक्तींना हे सहज शक्य होऊ शकते अन् शोषित, वंचित, पीडितांच्या पालात दिवाळीचा प्रकाश येऊ शकतो, असे झाल्यास हीच समाजऋणाची खरी उतराई होईल.