बोंडे हॉस्पिटलने पैशासाठी रोखला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:14 IST2021-04-22T04:14:10+5:302021-04-22T04:14:10+5:30
अमरावती : बोंडे हायटेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला कोविड-१९ रुग्ण उपचाराची परवानगी नसतानाही कोरोना संक्रमित रुग्णावर उपचार केला. उपचारादरम्यान रुग्णाचा मंगळवारी ...

बोंडे हॉस्पिटलने पैशासाठी रोखला मृतदेह
अमरावती : बोंडे हायटेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला कोविड-१९ रुग्ण उपचाराची परवानगी नसतानाही कोरोना संक्रमित रुग्णावर उपचार केला. उपचारादरम्यान रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला असताना मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता पैशासाठी रोखला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे किरण गुडधे यांनी केला. याप्रकरणी त्यांनी बुधवारी राजापेठ ठाण्यात बोंडे हॉस्पिटलविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी हे प्रकरण तपासात ठेवले आहे.
किरण गुडधे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आयसीएमआर व डब्ल्यूएचओ यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी २२ रुग्णालयांना मान्यता प्रदान करण्यात आली आहे. मात्र, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या हॉस्पिटलला कोविड रुग्णाच्या उपचाराबाबत परवानगी नाही. असे असताना येथे कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहे. सर्वसामान्य रुग्णांसोबत विश्वासघात होत आहे. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी चपराशीपुरा ६२ वर्षीय वृद्धाचा बोंडे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या वैद्यकीय फाईलचे अवलोकन केले असता, ५ एप्रिल रोजीच्या अहवालानुसार ते कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांना बोंडे हॉस्पिटलमधून कोविड रुग्णालयात रेफर करणे अनिवार्य होते. मात्र, पैसे उखळण्याच्या उद्देशाने वृद्धावर उपचार केला गेला. कोविड रुग्णालयाच्या कुठल्याही सोयी सुविधा नव्हत्या आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत गुडधे यांनी म्हटले. वृद्धाचा यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करणे अपेक्षित होते. परंतू १ लाख ७६ हजार ९०० रुपये बेकायदेशीर वैद्यकीय बिल वसूल करण्याच्या प्रयत्नात सायंकाळपर्यंत मृतदेह देण्यात आला नाही. त्यामुळे मृतदेहाची विटंबना झाली. त्यामुळे रुग्णालयातील संचालकांवर कायदेशिर कारवाई करून हायटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी असे गुडधे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
कोट
किरण गुडधे यांनी बुधवारी तक्रार नोंदविली. सदर प्रकरण डॉक्टरांविरुद्ध असल्याने नियमानुसार गुन्हा न नोंदविता तपासात ठेवले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
- मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजापेठ
कोट
सदर रुग्ण पूर्वी कोविड दुसऱ्या डॉक्टरकडे उपचार घेत होत. त्यानंतर रॅपिड टेस्ट निगेटिव्ह असल्याने आमच्याकडे उपचारासाठी दाखल केले. तेव्हा रुग्णाची प्रकृती चिंताजनकच होती. रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे व आधी त्यांना कोविड असल्याने मृतदेह महापालिकेच्या ताब्यात द्यायचा की नातेवाईकांच्या? यासंदर्भात विचारविनियम करण्यासाठी काही वेळ थांबविला होता. तक्रारकर्त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबध नाही.
- डॉ. स्वप्निल शिरभाते,
संचालक बोंडे हायटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल