ब्लाईंड कॉर्नर, गतिरोधक अपघाताचे मूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:14 IST2021-01-20T04:14:08+5:302021-01-20T04:14:08+5:30
फोटो पी १९ चांदूर फोल्डर चांदूर रेल्वे : वळणावर असलेले ब्लाईंड कॉर्नर, तेथे वाढलेली झाडेझुडपी आणि न दिसणारे स्पीड ...

ब्लाईंड कॉर्नर, गतिरोधक अपघाताचे मूळ
फोटो पी १९ चांदूर फोल्डर
चांदूर रेल्वे : वळणावर असलेले ब्लाईंड कॉर्नर, तेथे वाढलेली झाडेझुडपी आणि न दिसणारे स्पीड ब्रेकर हे अमरावती-वर्धा मार्गावरील अपघातांचे मूळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मार्गावरील मच्छी तलाव, तेलाई माता तसेच वर्धा बायपासवरील चौफुलीजवळ अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
वर्षभरात अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर शेकडो अपघात झाले. यात अनेकांचे प्राणही गेले. कित्येक जखमी झाले. पण, प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. ‘अपघातप्रवण स्थळ’ असे साधे फलक लावण्याचे सौजन्य प्रशासनाने दाखविले नाही. नव्याने चकाचक झालेल्या अमरावती रस्त्यावर वाहनांचा वेग वाढला आहे. त्यात वन्यभागामुळे रस्ताच्या कडेने पाटचऱ्या भरण्यास अडचण जात आहे. या रस्त्यावर अनेक वळणे आहेत आणि त्या वळणावर वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहेत.
वर्धा बायपासवरील पळसखेडकडे जाणारी चौफुलीदेखील अपघाताचे मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून गतिरोधक लावण्यात आले. पण, त्यावर पांढरे पट्टे न मारल्याने तो गतिरोधक दिसत नाही. त्यामुळे भरधाव वाहनांचे अपघात वाढत आहेत. अनेक वेळा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्यावर कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढील अपघाताला प्रशासन दोषी राहील, असे मत अनेक वाहनचालकांनी व्यक्त केले.
कंत्राटदार ऐकत नाही
गतिरोधकाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता, रस्त्याचे काम कंत्राटदाराकडे असून, त्यांना वारंवार सूचना देऊनही ते काम करीत नसल्याचे सांगून हतबल असल्याची प्रतिक्रिया
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.