इर्विन चौकात भाजपचे निदर्शने
By Admin | Updated: August 17, 2015 00:06 IST2015-08-17T00:06:19+5:302015-08-17T00:06:19+5:30
वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर होऊ नये, यासाठी काँग्रेस खासदारांनी लोकसभा व राज्यसभेत गोंधळ घातल्याच्या निषेधार्थ येथील भाजप कार्यकर्ते, ...

इर्विन चौकात भाजपचे निदर्शने
काँग्रेस खासदारांचा निषेध : जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप
अमरावती : वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर होऊ नये, यासाठी काँग्रेस खासदारांनी लोकसभा व राज्यसभेत गोंधळ घातल्याच्या निषेधार्थ येथील भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी रविवारी निदर्शने केली. काँग्रेसने नैतिकता गमावली असून देशात एकच कर प्रणाली लागू होत असताना खासदारांचा गोंधळ संयुक्तिक नाही, असा आरोप करण्यात आला.
स्थानिक इर्विन चौकात भाजपने निदर्शने करून काँग्रेस खासदारांचा निषेध केला. आ.सुनील देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, भाजपचे गटनेता संजय अग्रवाल, जिल्हा संघटनमंत्री शिवराय कुळकर्णी, भाजपच्या महिला शहराध्यक्ष राधा कुरील, मिलिंद चिमोटे, अशोक डोंगरे आदींच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा, राज्यसभेत चालविलेल्या गोंधळाचा कडाडून विरोध केला. यावेळी निषेध नोंदविताना देशात एकच कर प्रणाली लागू असताना काँग्रेस खासदारांनी सुरु केलेला गोंधळ निरर्थक आहे. प्रशासनात पारदर्शकता येऊन नागरिकांची कराच्या रुपात होत असलेली फसवणूक जीएसटीमुळे रोखली जाणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी संसदेत जीएसटी ही करप्रणाली लागू होऊ दिली नसल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. जीएसटी ही कर प्रणाली नागरिकांच्या हिताची आहे. संसदेत होत असलेला गोंधळ हा देशाचा अपमान आहे, असे आ. सुनील देशमुख म्हणाले. तसेच काँग्रेस खासदारांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला. गत आठवड्यात राज्यसभेचे कामकाज बघण्यासाठी विदेशातील एक प्रतिनिधी मंडळ आले असता काँग्रेस खासदारांनी केलेला तमाशा देशाची नाचक्की करणारा ठरला, असा आरोप तुषार भारतीय यांनी केला. यावेळी गंगा खारकर, प्रणव कुळकर्णी, रमेश शर्मा, छाया अंबाडकर, लता देशमुख, विश्वजीत डुमरे, उमेश निलगिरे, भारती डेहनकर, प्रतिभा तिडके, रचना टापर, शिला मोकलकर,पल्लवी लेव्हरकर, नीता माहुलकर, चेतन गावंडे, प्रशांत शेगोकार, राजू कुरील, विजय धामोरीकर, सतीश मोकलकर विशाल डहाके, राजेंद्र मेटे, सुहास ठाकरे, रुपेश दुबे, मिलिंद कारले, अविनाश चुटके, रवी शिंदे, शाम हिंगासपुरे, सुनंदा शेंद्र, शीतल वाघमारे, तनुजा देशमुख, ज्योती वैद्य, अलका सप्रे, छाया खंगाडे आदी उपस्थित होते.
इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात काँग्रेस खासदारांचा निषेध नोंदविण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांना भर पावसाचा सामना करावा लागला. आमदार सुनील देशमुख यांनी मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात करताच पावसाने हजेरी लावली. त्यानंतर तुषार भारतीय मार्गदर्शन करायला लागले तर पाऊस जोरात बरसला. त्यामुळे भाजपला काँग्रेस खासदारांचा निषेध भर पावसात नोंदवावा लागला.