अमरावती : बायोगॅस बांधून वर्ष होत आले तरी जिल्ह्यातील ७० पैकी २४ लाभार्थ्यांना अजूनही अनुदान मिळालेले नाही. याकरिता १० लाख ४१ हजारांची आवश्यकता असताना केवळ चार लाख ६६ हजारांचेच अनुदान प्राप्त झाले आहे. ग्रामविकास विभागाकडून याबाबत कार्यवाही केली जाते. निम्म्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांना अनुदान आणि इतरांना अनुदानाची प्रतीक्षा असे चित्र जिल्ह्यात आहे.
नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी सन २०१९-२० या वर्षासाठी ७० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने फेब्रुवारी २०२० अखेर ते पूर्ण केले. यातील सर्वसाधारण लाभार्थ्याला १२ हजार रुपये, तर अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना १३ हजार रुपये अनुदान देण्यात येते. या सर्व लाभार्थ्यांसाठी १० लाख ४१ हजार रुपयांच्या निधीची गरज होती. मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यात केवळ पाच लाख ६६ हजार रुपये अनुदान आले. जे ४६ लाभार्थ्यांच्या खात्यावर त्या महिन्याच्या अखेरीस जमा करण्यात आले. मात्र उर्वरित २४ लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आता बायोगॅस लाभार्थ्यांना अनुदान केव्हा मिळणार हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे.
बाॅक्स
बायोगॅसचे उद्दिष्ट -७०
अनुदान मिळालेले लाभार्थी - ४६
अनुदानाच्या प्रतीक्षेत लाभार्थी - २४
अनुदानाची एकूण मागणी - १० लाख ४१ हजार
अनुदानाचे वाटप - ५ लाख ६६ हजार
कोट
निम्म्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांना अनुदान मिळाले ही वस्तुस्थिती आहे. कोरोना कालावधीमुळे याकरिता विलंब झाला आहे. उर्वरित लाभार्थ्यांना अनुदान मिळून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
- विठ्ठल चव्हाण
उपाध्यक्ष तथा कृषी सभापती
जिल्हा परिषद