Bike break; Shivshahi hit school van | दुचाकीचा ब्रेक; शिवशाही धडकली स्कूल व्हॅनवर

दुचाकीचा ब्रेक; शिवशाही धडकली स्कूल व्हॅनवर

ठळक मुद्दे तीन विद्यार्थ्यांना जबर धक्का : गर्ल्स हायस्कूल चौक ते पोलीस पेट्रोल पंपादरम्यानच्या रोडवर घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एकामागोमाग जात असताना दुचाकीने अचानक बे्रक मारल्याने स्कूल व्हॅन तिला धडकली. त्याच क्षणी मागून येणारी एसटी महामंडळाची शिवशाही बस स्कूल व्हॅनवर आदळली. गर्ल्स हायस्कूल चौक ते पोलीस पेट्रोल पंपादरम्यान असणाऱ्या गतिरोधकाजवळ शुक्रवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. या अपघातात स्कूल व्हॅनच्या आत बसलेल्या तीन्ही विद्यार्थ्यांना जोरदार धक्का बसला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत स्कूल व्हॅनमधील तीन्ही विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. हे तिन्ही विद्यार्थी गोल्डन किड्स हायस्कूलचे आहेत. या अपघातात एका मुलाला किरकोळ मार लागला असला तरी बस अंगावर येत असल्याचे पाहून तिघेही प्रचंड धास्तावले होते. जखमी मुलांची माहिती काढण्यासाठी पोलीस रवाना झाले होते. मात्र, दुपारपर्यंत त्या मुलांना कुठे दाखल करण्यात आले, याची माहिती पोलिसांना मिळाली नव्हती.
दरम्यान शिवशाहीचे चालक सूर्यकांत शंकर सोनाने (रा. हिवरखेड, ह.मु. दर्यापूर) व स्कूल व्हॅनचालक शहजाद खान यासीन खान (५५, रा. लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा) यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. बसचालकाने बसच्या नुकसानाबाबत तक्रार दिली. अपघातानंतर प्रथम दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला नाही. या अपघातप्रकरणी उशिरा रात्रीपर्यंत कोणीही तक्रार दाखल केली नव्हती.

शिवशाही दर्यापूर-नागपूर मार्गाची
शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्ल्यू १२३७) दर्यापूरवरून ४३ प्रवासी घेऊन नागपूरला निघाली होती. यादरम्यान हा अपघात घडला. या घटनेच्या माहितीवरून एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे, यंत्र अभियंता प्रशांत वायकर, वाहतूक अधिकारी उमेश इंगळे, सुधीर जोशी व आगार व्यवस्थापक नितीन जयस्वाल यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी जखमी दाखल असलेल्या ठिकाणांची माहिती घेणे सुरू केले होते. गेल्या काही वर्षात शिवशाहीचे अनेक अपघात घडले आहेत. या बसचा वेग घातक ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सुरक्षित अंतराचे भान नाही
गर्ल्स हायस्कूल ते पोलीस पेट्रोल पंपापर्यंतच्या मार्गावर असणाºया गतिरोधकावरील पांढरे पट्टे आधीच अस्पष्ट झाले आहेत. त्यातच स्कूल व्हॅनचालकाने पुढे असणाऱ्या दुचाकी दरम्यान सुरक्षित अंतर ठेवले नाही. त्यामुळे दुचाकीने ब्रेक मारताच स्कूल व्हॅन तिला धडकली, तर शिवशाही बसचालकानेही सुरक्षित अंतर राखण्याचे भान न ठेवल्याने ही बस स्कूल व्हॅनला चिकटली. तिन्ही चालकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने हा अपघात घडला.

विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होती स्कूल व्हॅन
स्कूल व्हॅन (एमएच २७ एक्स ९६६७) ही गोल्डन किड्स हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होती. चालक शहजाद खान व्हॅन चालवित होते. त्यांच्यापुढील दुचाकीने अचानक बे्रक मारल्याने स्कूल व्हॅन दुचाकीवर आदळली आणि त्याक्षणी मागून येणारी शिवशाही बस स्कूलवर व्हॅनला धडकली. सुदैवाने तिन्ही वाहनांचा वेग कमी होता, अन्यथा मोठी घटना घडली असती.

Web Title: Bike break; Shivshahi hit school van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.