पराकोटीच्या दारिद्र्यात जगतोय भोई समाज
By Admin | Updated: August 1, 2014 00:05 IST2014-08-01T00:05:25+5:302014-08-01T00:05:25+5:30
गरीब, सालस, निगर्वी, नि:स्वार्थी व प्रामाणिकपणे मासे पकडण्याचे काम करणारा विदर्भातील भोई समाज पराकोटीच्या दारिद्र्यात जगत आहे. नदीपात्रात मासे पकडण्यासाठी संपूर्ण आयुष्य

पराकोटीच्या दारिद्र्यात जगतोय भोई समाज
मोहन राऊत - धामणगांव रेल्वे
गरीब, सालस, निगर्वी, नि:स्वार्थी व प्रामाणिकपणे मासे पकडण्याचे काम करणारा विदर्भातील भोई समाज पराकोटीच्या दारिद्र्यात जगत आहे. नदीपात्रात मासे पकडण्यासाठी संपूर्ण आयुष्य जात असताना उद्याच्या पिढीला अनूसुचित जाती-जमातीच्या सवलती मिळणार कधी, असा प्रश्न या समाज बांधवांनी निर्माण केला आहे़
बारा बलुतेदारानंतर अठरा अलुतेदारातील महत्त्वाचा घटक म्हणजे भोई समाज़ या समाजाला इतिहास मोठा आहे़ पूर्वीच्या काळी राजेवाड्यात पालखी वाहण्याचा मान भोई समाजाला होता़ आजही अनेक राज्यात मंदिरातील पालखी भोई समाज बांधवांचा हात लागल्या शिवाय पुढे जात नाही़वेदकाळ, रामायण, महाभारतातील काळ, मध्ययुगीत काळ, शिवकाळप्रमाणे स्वातंंंंत्र्यपूर्व काळात लोकपयोगी समाज म्हणून या जमातीकडे पाहिले आहेत़
भोई जमात सांस्कृतिकदृष्ट्या आदिवासी असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे़ भारतीय नागरिकत्व असताना एका राज्यात या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळतात तर दुसरीकडे नोकरी, शिक्षण क्षेत्रात टिकाव न लागणाऱ्या विमुक्त भटक्या जमातीच्या सवलती दिल्या जातात़ आज ओरिसा, बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, या राज्यात या समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळतात़ परंतु महाराष्ट्रात हा समाज या सवलतीसाठी शासनाची पायरी झिझवत आहे़ १९४७ नंतर भटक्या विमुक्त जमातीच्या सवलती भोई समाजाला मिळाल्या हे जेवढे सत्य आहे़ तेवढेच या समाजाला या सवलतीचा लाभ शेवटच्या घटका पर्यंत मिळाला नाही़ ही बाब सुध्दा सुर्यप्रकाशा ऐवढी सत्य आहे़
भोई समाजाचा पारंपारीक व्यवसाय आता संकटात आला आहे़ कमी पर्जन्यमानामुळे नदी नाले तलावातील पाण्याची पातळी पुर्णत: घटली आहे़ अनेक तलाव कोरडे पडले आहे़ पुर्वी पासून आर्थीक व शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत असलेला भोई समाज मासे मारीचा व्यवसाय करून जगत असे़
पूर्वी पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होत असल्याने गावाकडील नद्यांना बारमाही पाणी राहत असत़ त्यावेळी मासेमारी व्यवसायातून उत्पन्न व्हायचे आता तलाव नदी, कोरडे पडले आहे़ त्यामुळे ग्रामीण भागात मासेमारी हा व्यवसाय डबघाईस आला आहे़ पूर्वी या समाजातील व्यक्ती कापसा पासून सूत करून या सूतापासून मासळीचे जाळे विणन्याचे काम करीत असत़ जाळ्यामाधून पकडलेले मासे ताजे रहावे यासाठी बांबूपासून तयार केलेली धुटी पाठीवर ठेवून त्यात मासे ठेवले जात होते़
कालांतराने नायलॉनचे रेडीमेड महागडे जाळे बाजारपेठेत विक्रीस आल्याने जाळे विणण्याचे कामही बंद पडले आहे़ या जाळ्यांचा भाव अधिक असल्याने अनेकांना व्याजाने पैसे घ्यावे लागतात़ या समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण अल्प असल्यामुळे बेरोजगारांची संख्याही वाढली आहे़ त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी मत्स्य व्यवसाय संस्थेची निर्मिती करण्यात आली़ परंतु पाणीच नसल्याने त्या कुचकामी ठरल्या आहेत़
एकीकडे माशाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे तर दुसरीकडे या व्यवसायात कंत्राटदार मोठ्या प्रमाणात शिरल्याने या समाजावर उपासमारीची पाळी आली आहे़ शासनाने या समाजाला मोफत जाळे, अनुदानात वाढ करावी. नवीन वर्षासाठी मत्स्यबीज अनुदान तत्त्वावर मिळावे, नुकसान भरपाई मिळावे, घरकूल योजनेचा लाभ मिळावा, बीपीएलच्या यादीत समावेश व्हावा, अशा विविध मागण्या या समाजाच्या शासनदरबारी आहेत़