सावधान! व्हॉट्सॲप ‘पिंक’च्या फंदात पडाल तर व्हाल कंगाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 11:54 AM2023-06-26T11:54:25+5:302023-06-26T12:00:27+5:30
सायबर भामट्यांची नवी शक्कल : वापरकर्त्यांच्या फोनमधील डेटा ‘टार्गेट’
अमरावती : सायबर गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवून सर्वसामान्यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करीत असतात. त्यात लॉटरीची बतावणी, केवायसी, पार्टटाईम जाॅबचे आमिष दाखवून क्षणात तुमचे बँक खाते रिकामे केले जाते. फसवणुकीच्या त्या मालिकेत काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘न्यू पिंक व्हॉट्सॲप’ लिंक सायबर भामट्यांकडून व्हायरल केली जात आहे.
लिंकला ओपन केल्यानंतर गुलाबी रंगाचे व्हॉट्सॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले जाते. हे पिंक व्हॉट्सॲप डाउनलोड केल्यास त्यामुळे मोबाईल हॅक होऊन त्यातील गोपनीय माहिती सायबर भामट्यांच्या हाती लागून त्याआधारे फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घोटाळ्यात व्हॉट्सॲपवर यूजर्सना एक लिंक पाठवली जाते. या लिंकवरून यूजर्सना व्हॉट्सॲप पिंक व्हर्जन डाउनलोड करण्यास सांगितले जाते. हे ॲप वापरकर्त्यांच्या फोनमधील वैयक्तिक डेटा चोरते. ते ॲप इन्स्टॉल करणाऱ्या यूजर्सचे त्यांच्या मोबाइलवरील नियंत्रण सुटू शकते किंवा त्यांचा मोबाइल हॅक होऊ शकतो आणि फसवणूक करणाऱ्यांना तुमचा कॅमेरा, स्टोरेज, कॉन्टॅक्टमध्येही प्रवेश मिळू शकतो.
नेमके काय आहे पिंक व्हॉट्सॲप?
सध्या सोशल मीडियावर न्यू पिंक नावाने व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲपवर तो मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये व्हॉट्सॲपचा एक नवीन अपडेट आला असल्याचे सांगत, व्हॉट्सॲपचा रंग बदलला असल्याचे सांगितले जात आहे तसेच नव्या पिंक व्हॉट्सॲपसोबत काही खास फिचर्सही दिले जात असल्याचे सांगितले जाते.
इन्स्टॉल केल्यास नेमके काय होते ?
व्हॉट्स ॲप पिंक' लिंक सध्या फिरत आहे. सोशल मीडियावर स्क्रोल करतानादेखील तुम्हाला त्याची जाहिरात प्राप्त होऊ शकते. त्यावर क्लिक करताच तेथून तुम्हाला लिंक अनोळखी संकेतस्थळावर घेऊन जात एपीके फाइल इन्स्टॉल करण्यास सांगते. त्याद्वारे ॲप/लिंक इन्स्टॉल होताच मोबाइलमधील संपर्क क्रमांक, फाइल मॅनेजर, व्हाॅइस, लोकेशनची परवानगी मागते. सहसा वापरकर्ते ते सर्व मान्य करत पुढे जातात व काही क्षणात तुमच्या मोबाइलचा ताबा पूर्णपणे सायबर गुन्हेगारांच्या हाती जातो.
ती फिशिंग लिंक, डेटा होऊ शकतो चोरी
पोलिसांनुसार, पिंक व्हॉट्सॲप अधिकृत नसून त्यामुळे तुमचा फोन, खासगी माहिती हॅक केली जाऊ शकते. पोलिसांनी ती एक फिशिंग लिंक असल्याचे सांगितले आहे. तो एक प्रकारचा व्हॉट्सॲप व्हायरस असून त्या लिंकवर क्लिक केल्यास मोबाईल हॅक होऊन तुमचे फोटो, व्हिडीओ तसेच तुमची गोपनीय वैयक्तिक माहिती तसेच बँक तपशीलाची चोरी होऊ शकते. त्या लिंकवर क्लिक केल्यास वापरकर्त्याच्या फोनवर फिशिंग हल्ला होऊ शकतो.