जिल्ह्यात बर्ड फ्लूसंदर्भात सर्तकता बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:39 IST2021-01-08T04:39:05+5:302021-01-08T04:39:05+5:30
अमरावती : देशातील राजस्थान, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश, केरळ, गुजरात राज्यांत कावळे व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव ...

जिल्ह्यात बर्ड फ्लूसंदर्भात सर्तकता बाळगा
अमरावती : देशातील राजस्थान, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश, केरळ, गुजरात राज्यांत कावळे व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. परंतु, जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका नाही, मात्र सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
मागील काळात बर्ड फ्लूने कशाप्रकारे थैमान घातला होता, याची प्रचिती सर्वांनाच आहे. यामुळे अनेक पोल्ट्री व्यवसाय बंद झाले होते. जिल्ह्यात ४०० पोल्ट्री उद्योग असून, यात २० लाख पक्षी आहेत. मागील काळात बर्ड फ्लूचा झालेला प्रादुर्भाव लक्षात घेता आताच्या परिस्थितीत मोठा बदल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे स्वत: पोल्ट्री संचालक पक्ष्यांची योग्य काळजी घेतात. तसेच वेळेवर औषधोपचार व स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्याला लागून मध्यप्रदेश राज्याच्या सीमा असल्यामुळे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने अधिनस्त कार्यक्षेत्रात विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. त्यासंबंधी क्षत्रिय अधिकारी आणि संस्थांना त्वरित अवगत करण्यात आले आहे. तसेच कार्यक्षेत्रात कुक्कट पक्षी, वन्यपक्षी आणि स्थलांतरित पक्षी यांच्या असाधारण मृत्यू होत असल्याबाबत सतर्क राहून त्वरित रोग अन्वेषण विभाग औंध पुणे या संस्थेशी संपर्क साधाण्याच्या सूचना दिल्या आहेत. एवियन इन्फ्लूएन्झा म्हणजेच बर्ड फ्लूचा संसर्ग खूप लवकर होतो. त्याकरिता जिल्हास्तरावर आरआरटी पथक स्थापन करण्यात आले आहे.
बॉक्स
जैव सुरक्षितता बाळगा
राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश व केरळात बर्ड फ्लूच्या एच ५ व एचएस ८ ह्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव दिसून आला असला तरी कुक्कट पक्ष्यांमध्ये कुठेही रोग नाही. एच ५ व एचएस ८ पासून मानवाला संसर्ग झाल्याचे कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे कुक्कट पक्षी सुरक्षित आहे. मात्र, जैव सुरक्षा पाळणे गरजेचे आहे. रॅपिड रिस्पाॅन्स टिम तालुकानिहाय तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय राहाटे यांनी केले आहे.