एपीएल कार्डधारक शेतकऱ्यांना रोख रक्कम हस्तांतरणद्वारे लाभ
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 24, 2023 17:26 IST2023-03-24T17:24:49+5:302023-03-24T17:26:04+5:30
३.८० लाख लाभार्थ्यांना वर्षाकाठी अठराशे रूपये

एपीएल कार्डधारक शेतकऱ्यांना रोख रक्कम हस्तांतरणद्वारे लाभ
अमरावती : शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी आता थेट रोख रक्कम हस्तांतरण (डीबीटी) द्वारे प्रति लाभार्थी वार्षिक १ हजार ८०० रूपये रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेचा जिल्ह्यातील ३ लाख ७९ हजार ८८२ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. मात्र, शासनाने अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ९३ हजार ७७८ शेतकरी कुटुंबांतील ३ लाख ७९ हजार ८८२ या व्यक्तींना दरवर्षी १ हजार ८०० रुपये डीबीटीद्वारे देण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना प्रतिमाह प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य, दोन रूपये प्रति किलो गहू व तीन रूपये प्रति किलो तांदूळ या दराने उपलब्ध करून देण्यात येत होते. तथापि, या योजनेत काही कारणास्तव गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने कळविले आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना लाभ
राज्यात अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, तसेच नागपूर विभागातील वर्धा, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली अशा एकूण १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात आता योजनेचा लाभ दिला जाणार आहे.