१.४७ लाख शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST2021-03-13T04:22:13+5:302021-03-13T04:22:13+5:30
अमरावती : नियमित पीककर्ज भरणा केल्यास व्याज सवलत देण्याची घोषणा वित्तमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. याबाबत रीतसर ...

१.४७ लाख शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ
अमरावती : नियमित पीककर्ज भरणा केल्यास व्याज सवलत देण्याची घोषणा वित्तमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. याबाबत रीतसर जीआर निघेल. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील नियमित १.४७ लाख कर्जदारांनी पीककर्जाचा भरणा ३० जूनपर्यंत केल्यास त्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याज सवलत मिळणार आहे. तसे बदल डाॅ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या निकषात करण्यात येणार आहे.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यात नियमित कर्जदारांंना कृषी कर्जासाठी सवलत देण्याची घोषणा केलेली आहे. शासनाचे ३ डिसेंबर २०१२ चे शासनादेशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या निकषात बदल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार १ लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर मुदतीत परतफेड झाल्यास ३ टक्के व्याज सवलत मिळते व १ ते ३ लाखांपर्यंतचे कर्ज मुदतीत म्हणजेच ३० जूनपर्यंत भरणा केल्यास १ टक्क्यांपर्यंत व्याजात सवलत मिळते. विशेष म्हणजे या योजनेत सर्वच बँका कव्हर करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी नाबार्डकडून जिल्हा बँकेला व तेथून गावागावांतील विकास सोसायटींमार्फत खातेदारांना कर्जपुरवठा करण्यात येतो. यात एक लाखांपर्यंतचे कर्ज शून्य दराने शेतकऱ्यांना मिळते. मात्र जिल्हा बँकेला हे सहा टक्क्यांपर्यंत पडते. यात प्रत्येकी केंद्र व राज्य शासन तीन टक्के व्याज देते. एक ते तीन लाखांच्या व्याजासाठीदेखील राज्य शासन तीन व केंद्र शासन दोन टक्के रक्कम देते. आता ही सवलत तीन लाखांपर्यंतच्या नियमित कर्जधारकास मिळणार आहे. मात्र, यातील निकष प्रत्यक्ष जीआरमध्ये स्पष्ट होणार आहे.
बॉक्स
६० हजार शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांची सवलत
शासनाने दोन लाखांपर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र, नियमित शेतकऱ्यांना कुठलाही लाभ न दिल्याने या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत लाभ देण्याचे आतापर्यंत कित्येकदा आश्वासन देण्यात आले व बुधवारी वित्तमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यात किमान ६० हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
कोट
जोवर याविषयीचे आदेश प्राप्त झाल्यावर त्यात काय निकष आहे, हे पाहिल्यावर भाष्य करणे
अधिक उचीत होईल. जिल्ह्यात सध्या १.४७ लाख नियमित शेतकरी आहे व त्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० जूनपर्यंत कर्जाचा भरणा करणे आवश्यक आहे.
- संदीप जाधव,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)
पाईंटर
नियमित कर्जदार :१,४७,४६०
बँकाद्वारे कर्जवाटप :१३२१.१४ कोटी
राष्टीयीकृत बँकाचे खातेदार : ९४,१८३
ग्रामीण बँकांचे खातेदार :१,५२९
जिल्हा बँकेचे खातेदार : ५१,७४८