जुलैच्या आपत्तीसाठी मिळणार विम्याचा लाभ

By Admin | Updated: August 2, 2016 23:58 IST2016-08-02T23:58:33+5:302016-08-02T23:58:33+5:30

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

Benefit of insurance for July disaster | जुलैच्या आपत्तीसाठी मिळणार विम्याचा लाभ

जुलैच्या आपत्तीसाठी मिळणार विम्याचा लाभ

पंतप्रधान पीक विमा योजना : प्राथमिक अहवालात ८ हजार हेक्टर बाधित
अमरावती : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पिकाला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळते. त्यामुळे जुलै महिन्यात नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जी शेतजमीन खरडून गेली, अशा जमिनीला प्रतिनिधिक निर्देशांकाच्या आधारे अपेक्षित नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम आगाऊ रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात किमान ८ हजार हेक्टर क्षेत्राचा याचा लाभ होणार आहे.
जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकाकरिता राबविण्यात येत आहे. या योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या विमा संरक्षणाच्या बाबीमध्ये वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून विमा कंपनीद्वारा महसूल व कृषी विभागाच्या मदतीने नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे.
या विमा योजनेत सहभागी होण्यासाठी २ आॅगस्टही ही शेवटची तारीख असली तरी ज्या शेतकऱ्यांनी या योजनत सहभाग नोंदविला, त्या शेतकऱ्यांना नदी नाल्यांच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई नुकसान मर्यादेच्या २५ टक्के प्रमाणात मिळणार आहे.
यासाठी योजनेत सहभागी शेतकऱ्यांना घटना घडल्यापासून ४८ तासांच्या आत याबाबतची सूचना दिनांक, वेळ, नुकसानीचे कारण, प्रकार, प्रमाण व सर्व्हे नंबरसहीत विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी, महसूल विभाग किंवा कंपनीचे टोल फ्री क्रमांक ०२०-६९०००,फॅक्स क्रमांक ०२०-३०५६५१४३ व टोल फ्री क्रमांक १८००-२७००-४६२ या क्रमांकावर कळवावी लागणार आहे.
शेतकऱ्यांनी नूकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह ७/१२, पिकाची नोंद असलेला विमा हप्ता भरलेला पुरावा, विमा कंपनीला सादर करणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी विहीत नमुन्यात माहिती सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू शकतो. परंतु अर्जातील उर्वरित माहिती ८ दिवसांच्या आत विमा कंपनीस सादर करणे अनिवार्य राहील व पीक नुकसानीचा पुरावा म्हणून घेतलेली छायाचित्रे देता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा अनुदान मिळण्याची प्रक्रिया सोयीस्कर होणार आहे. (प्रतिनिधी)

अमरावतीत चार हजार हेक्टर बाधित
महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार १ ते १२ जुलै या कालावधीत आपत्तीमुळे ११ हजार १७ शेतकऱ्यांच्या ७ हजार ८७० हेक्टर क्षेत्राचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते. कापूस, तूर व सोयाबीन पिकाचे हे नुकसान झाले आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात सर्वाधिक ४००६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. धामणगाव रेल्वे ६००, भातकुली ८००, अचलपूर ३८०, अंजनगाव २००, दर्यापूर ५००, धारणी १७, चिखलदरा १२, मोर्शी ९११, वरुड ८, चांदूर बाजार ४०० व तिवसा तालुक्यात ४५ हेक्टरमधील पिकांचे पुरामुळे नुकसान झाले आहे.

३० दिवसांत मिळणार भरपाई
विमा कंपनीद्वारा माहिती प्राप्त झाल्याच्या ४८ तासांत नुकसानीचे मूल्यांकन निश्चित करण्यासाठी पर्यवेक्षकाची नियुक्त करण्यात येईल व पुढील १० दिवसांत नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. जर बाधित क्षेत्र हे अधिसूचित विमा क्षेत्राच्या २५ टक्केपर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर पात्र शेतकऱ्यांचे नुकसान ठरविण्यात येणार आहे. जर हे क्षेत्र विमा संरक्षित क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा जास्त असेल तर या क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी हे काढणी पश्चात नुकसान भरपाई मिळण्यास पात्र राहणार आहे.

Web Title: Benefit of insurance for July disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.