लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासननियुक्त कंपनीने नेमलेल्या कंत्राटी जिल्हा तांत्रिक कर्मचाऱ्याने येथील जिल्हा पुरवठा कार्यालयात तब्बल २३.५७ लाख रुपयांची आर्थिक अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १९ ऑगस्ट रोजी अभिजीत भुस्कडे (रा. दुर्गाविहार अमरावती), हेमंत सूर्यवंशी (३०) व दोन महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. एपीएल डीबीटी योजनेचे अनुदान लाभार्थीच्या खात्यात न टाकता भुस्कडे याने ती रक्कम स्वतः सह अन्य तिघांच्या खात्यात वळती केली.
१ ऑक्टोबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान ती अफरातफरीची मालिका चालली. यातील अभिजीत भुस्कडे हा जिल्हा पुरवठा कार्यालयात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत होता. त्याच्या जागेवर लागलेल्या एका नव्या कर्मचाऱ्याने केलेल्या पडताळणीमुळे ही अफरातफर उघड झाली. भुस्कडेकडे शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या शेतकरी सुविधांचे वाटप करण्याचे काम होते. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भुस्कडे याला एपीएल डीबीटी अनुदान वाटपाची यादी मागितली असता, त्याने ती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे लांडे यांना आरोपीबद्दल संशय आला. चौकशी केली असता त्याने उडवाउडवी केली. त्यामुळे लांडे व जिल्हा पुरवठा कार्यालयामधील अन्य अधिकाऱ्यांच्या पत्रव्यवहारानंतर तेथे भुस्कडेऐवजी प्रसाद रायटे यांची नियुक्ती झाली.
एप्रिल २०२४ मध्ये चौकशी समितीभुस्कडे याला वारंवार मौखिक सूचना देऊन त्याने डीएसओ यांना एपीएल डीबीटी योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या व अनुदानाची यादी दिली नाही. त्यानंतर २५ एप्रिल २०२४ च्च्या आदेशाने त्या याद्या व एपीएल डीबीटीबाबत चौकशी समिती नेमण्यात आली. समितीनेदेखील त्याने याद्या उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे ३१ मार्च २०२५ रोजी त्याला जिल्हा पुरवठा कार्यालयातील पदाहून कमी करण्यात आले. तसे शासनाला कळवून नविन तांत्रिक कर्मचारी पुरविण्यासाठी पत्रदेखील देण्यात आले होते.
स्वतः सह चौघांच्या खात्यात रक्कम केली ट्रान्सफर
- प्रसाद यांनी संपूर्ण डेटा तपासला. अभिजीत भुस्कडे व हेमंत सूर्यवंशी हे शेतकरी लाभार्थी नसतानादेखील त्यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात एकूण २३ लाख ५७ हजार ५०० रुपये ट्रान्सफर करून अफरातफर केल्याचे प्रसाद यांच्या लक्षात आले. दरम्यान, त्यांनी शेतकरी लाभार्थीची यादी तपासली असता, अभिजीत भुस्कडे याने स्वतः सह हेमंत सूर्यवंशी व दोन महिलांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम वळती करून शासकीय पैशांची अफरातफर केल्याचे समोर आले.
- शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांकरिता एपीएल डीबीटी योजना सुरू केली. त्यात शेतकरी शिधापत्रिकाधारकाला धान्याऐवजी १५० रुपये प्रतिव्यक्ती प्रतिमाह थेट पात्र लाभार्थ्याच्या खात्यात डीबीटीद्वारे पाठविले जाते. ती रक्कम आता १७० रुपये झाली आहे. ती रक्कम भुस्कडेने परस्पर लाटली.
"गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यात गुन्हादेखील नोंद झाला. यातील अभिजीत भुस्कडे हा आर्थिक अफरातफरीच्या काळात शासननियुक्त त्रयस्थ संस्थेमार्फत डीएसओमध्ये कार्यरत होता."- निनाद लांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी
"जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री दोन पुरुष व दोन महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान आरोपींचे रोल निष्पन्न होतील."- अतुल वर, ठाणेदार, गाडगेनगर