अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या हाती भिक्षापात्र
By Admin | Updated: July 26, 2014 23:53 IST2014-07-26T23:53:07+5:302014-07-26T23:53:07+5:30
अतिवृष्टीने चार दिवसांपूर्वी संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्यानंतर महसूल विभागाकडून कोणतीच आर्थिक मदत न मिळाल्यामुळे तालुक्यातील वडगाव राजदी येथील एका कुटुंबावर अक्षरश: हाती भिक्षापात्र घेण्याची वेळ

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या हाती भिक्षापात्र
मोहन राऊत - धामणगाव रेल्वे
अतिवृष्टीने चार दिवसांपूर्वी संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्यानंतर महसूल विभागाकडून कोणतीच आर्थिक मदत न मिळाल्यामुळे तालुक्यातील वडगाव राजदी येथील एका कुटुंबावर अक्षरश: हाती भिक्षापात्र घेण्याची वेळ आली आहे़ गावात घरोघरी उसनवारी करून आतापर्यंत या शेतकरी कुटुंबाने गुजराण केली. परंतु आता या कुटुंबाकडे ग्रामस्थही दुर्लक्ष करीत असल्यामुळे जगावे कसे? असा प्रश्न या कुटुंबाला पडला आहे.
वडगाव राजदी येथील गिरजाबाई वामनराव मेश्राम या महिलेचे घर मागील आठवड्यात तीन दिवस झालेल्या वादळी पावसाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास जमीनदोस्त झाले. यात घरातील कर्ता पुरूष सुनील मेश्राम (३२), जोत्स्ना सुनील मेश्राम (२८), सुहानी (५), सोहम (२) हे गंभीर जखमी झाले. या कुटुंबाने रात्रीच गावातील समाज मंदिरात आश्रय घेतला. चार दिवसांपासून हे कुटुंब समाज मंदिरात आहे़ त्यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्याची विल्हेवाट लागली आहे. दोन वेळच्या जेवणाचीही सोय नसल्याने या कुटुंबाला सध्या गावकरी मदत करीत आहेत. परंतु हे कुठवर चालणार? हा खरा प्रश्न आहे. प्रशासनाकडून या कुटुंबाच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था बिकटझाली आहे. या गावातील तलाठ्याने दोन दिवसानंतर कोसळलेल्या घराचे सर्वेक्षण केले. परंतु संपूर्ण घर जमीनदोस्त होऊन अशंत: नुकसान दाखविण्याचा प्रताप तलाठ्याने केला़