शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण होतेय लुप्त

By Admin | Updated: September 29, 2015 01:46 IST2015-09-29T01:46:34+5:302015-09-29T01:46:34+5:30

स्मार्ट सिटीचा बँड वाजत असतानाच शहरातील अनेक मुख्य चौकांचे सौंदर्य बिघडले आहे. चौकातील पुतळ्यांचा रंग उडाला.

The beautification of the squares of the city is missing | शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण होतेय लुप्त

शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण होतेय लुप्त

शहरातील वेलकम चौक, मॉ जिजाऊ चौक, दस्तुरनगर चौक, राजापेठ चौक, चित्रा चौक, पठाण चौक आदी चौंकांचे सौंदर्यीकरण महानगरपालिकेने केले आहेत. त्यावर लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. तरीही चौकांची देखभाल, स्वच्छता राखली जात नाही. म्हणजे ही सामान्य जनतेच्या पैशांची उधळपट्टी नाही काय? चौक सुशोभिकरण झाले तर शहराकडे बाहेरच्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा राहील.

मनीष कहाते ल्ल अमरावती
स्मार्ट सिटीचा बँड वाजत असतानाच शहरातील अनेक मुख्य चौकांचे सौंदर्य बिघडले आहे. चौकातील पुतळ्यांचा रंग उडाला. त्यामध्ये लावलेले लाईट बंद आहेत. लोेखंडी कठडे तुटलेले आहेत. लॉनची जागा गवताने घेतली आहे. चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यावर मातीचे ढिगारे चढले आहेत. दुसरीकडे स्मार्ट सिटीचा बॅन्ड जोरात वाजत आहे.
शहरातील सर्वात मोठा चौक म्हणजे वेलकम अमरावती चौक. या चौकातून नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशीम, पुणे इत्यादी ठिकाणी जाता येते. खासगी ट्रॅव्हल्स येथेच थांबतात. शहराचे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चे मुख्यद्वार या चौकात आहे. त्यामुळे या चौकात दगडाने बांधलेल्या रस्त्याच्या दोन्ही कडेला भल्यामोठ्या भिंती उभ्या आहेत. त्यापैकी एका भिंतीवर फक्त इंग्रजीमध्ये ‘कम’ लिहले आहे. तर दुसऱ्या भिंतीवरचे ‘अमरावती’ नाव गायब झालेले आहे. दगडाच्या भिंतीवरचे दगड उखडलेले आहेत. भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेली आहेत. त्यामुळे अर्धी भिंत झाडाझुडपांनी वेढली आहे. तेथील फुटपाथवर ठेवलेल्या बेंचच्यावर हॉटेल आणि खासगी ट्रॅव्हल्सने कब्जा केलेला आहे. त्यामुळे नागरिकांना बसण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. येथील प्रत्येक भिंतीला वेलकम अमरावती नाव दिसण्याकरिता फोकस लाईट लावण्यात आले आहेत. परंतु तेही चोरीला गेले आहेत. त्यामुळे केवळ दगडाच्या भिंती शोभेच्या वास्तु बनल्या अहेत.
शहरातील पोलीस अधीक्षक बंगल्याशेजारी आणि परिवहन अधिकारी कार्यालयाजवळ असलेला जिजाऊ चौक या चौकांच्या सौंदर्यीकरणावर ७-८ महिन्यांपूर्वी ८ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र सौंदर्यीकरणातील पाण्याचे कारंजे अद्याप सुरू झाले नाही. माँ जिजाऊच्या पुतळ्यावर माती बसली आहे. कारंज्याचे पाणी साठविण्याच्या टाक्यात शेवाळ साचलेले आहे. चौकातील पुतळ्याचे लोखंडी कम्पाऊंडचे गेट चोवीस तास उघडे राहते. पुतळा परिसरात विजेची आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे साडेआठ लाख रुपये खर्चून झालेले सौंदर्यीकरण नागरिकांच्या दृष्टिक्षेपास पडत नाही.
चांदूररेल्वे मार्गावरील सुंदरलाल चौक, चौकात उभा असलेल्या ‘स्टॅच्यू’वरचा रंग उडाला आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडे वाढलेली आहेत. त्यामध्ये तीन विजेचे लाईट आहेत. तेही भंगार अवस्थेत आहेत. दस्तुरनगर चौकातील पुतळ्याचा रंग उडालेला आहे. लोखंडी कठडे तुटलेले आहेत. मार्बलही उखडलेले आहे.चौकातील वाहतूक सिग्नल तुटलेले आहेत.
शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणून ओळख असलेला राजापेठ चौक. यवतमाळ, अकोला आणि वाशीमकडे जाणाऱ्या बसेस याच चौकात थांबतात. अगदी त्याच ठिकाणी चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आलेले आहे. भलामोठा ‘स्टॅच्यू’ तिथे लावण्यात आला आहे. मात्र त्याच्यावरचा रंग उडाल्याने स्टॅच्यूला भेगा पडल्या आहेत. गेल्या ७-८ वर्षांपासून पाण्याचे कारंजे बंद पडले आहेत. त्यामधील स्टाईल उखडलेल्या आहेत. विजेचे दिवे भंगार अवस्थेत आहे. कठड्याच्या आजूबाजूला जाहिरातीचे फलक लागलेले आहेत. लॉनची जागा गवताने, काडीकचऱ्याने घेतली आहे. बेंचची जागा दारुड्यांनी घेतली आहे. सौंदर्यीकरणाच्या फरशीवर गांजा ओढणारे बसतात. पिण्याच्या पाण्याच्या टाकीला नळ लावलेला आहे. त्याचा वापर हे दारुडे करतात. शहरातील चित्रा चौकातील स्टिलचे कठडे तुटलेले आहेत. खालचा सिमेंट काँक्रीटचा भाग उखडलेला आहे. गर्ल्स हायस्कूल चौकातील पाण्याचे फवारे बंद आहेत. लोखंडी कठडे तुटलेले आहेत.

राजापेठ चौकाचे सुशोभिकरण होणे गरजेचे आहे. सौंदर्यीकरण झाले तर चार लोकं अनंदाने बसतील.
- अतुल गावंडे,
नागरिक, राजापेठ.

शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे वेलकम पॉर्इंट. हे ठिकाण भकास असेल तर शहर कसे असणार, असा प्रश्न शहराबाहेरील व्यक्तीला नक्कीच पडतो.
- आशिष मालू,
नागरिक, अमरावती.

शहरातील रस्ते, चौक चकाचक पाहिजे. तरच स्मार्ट सिटीचा उदोउदो करा. सौंदर्यीकरण होणे आवश्यक आहे.
- शरद देरणकर,
नागरिक, अमरावती.

Web Title: The beautification of the squares of the city is missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.