टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; उदरविकाराची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:07+5:302021-06-17T04:10:07+5:30

आजरपणाला निमंत्रण; अपचनातून व्याधींची शक्यता अमरावती : टीव्ही पाहत, वाचन करत जेवण करणे म्हणजेच थेट पोटविकारांना निमंत्रण देण्यासारखेच आहे. ...

Be careful if you are sitting in front of the TV eating; Fear of stomach upset | टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; उदरविकाराची भीती

टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; उदरविकाराची भीती

आजरपणाला निमंत्रण; अपचनातून व्याधींची शक्यता

अमरावती : टीव्ही पाहत, वाचन करत जेवण करणे म्हणजेच थेट पोटविकारांना निमंत्रण देण्यासारखेच आहे. असे केल्यामुळे आपण काय खातोय हेच लोकांना समजत नाही. त्यातून अपचनापासून पोटाचे अनेक विकार आणि पर्यायाने त्यातून आरोग्याची समस्या भेडसावण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान, असा सतर्कतेचा इशारा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

आज काल लहान मुले टीव्हीशिवाय जेवण करीत नाहीत. लहान असो वा मोठे प्रत्येकाला जेवण करताना टीव्ही पाहण्याची सवय लागली आहे. टी पाहताना जेवण करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यातील संगीत, भीतीदायक प्रसंग यामुळे आपण किती जेवतो, याचे भान नसते. अनेकदा नकळत ताटातील जेवण संपले तरीही कळत नाही. यामुळे प्रमाणापेक्षा जास्त अन्न पोटात जाते. परिणाम पोटाच्या तक्रारी वाढतात. घरात मित्रमंडळी अथवा कुटुंबीयांसोबत टीव्ही पाहताना चीपसारखे फास्ट फूड, जंकफूड आवर्जून खाल्ले जाते. लक्ष टीव्हीकडे राहत असल्याने आपण त्याची किती पॅकेट संपवतो याकडे लक्ष नसते. अधिक प्रमाणात असे पदार्थ खाल्ल्याने अनेक आजार डोके वर काढतात. टीव्हीसमोर बसून जेवण केल्याने मेटॅबोलिक प्रक्रिया हळूहळू होते. त्यामुळे कमरेभोवती अनावश्यक चरबी निर्माण होते. खासकरून लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. जेवण करताना टीव्ही पाहिल्याने पचनक्रिया बिघडते. याचा परिणाम झोपेवर होतो. टीव्हीसमोर बसून जेवण केल्याने आपल्या मेंदूचे लक्ष पूर्णपणे टीव्हीकडे असते. त्यामुळे खात असलेल्या अन्नाची चव लागत नाही. जेवण केल्याचे समाधान मिळत नाही. टीव्हीसमोर बसून जेवण्याचे अनेक वाईट परिणाम आरोग्यावर होत असल्याचे आढळून आले आहे. टीव्हीतील प्रसंगाकडे अनेकांचे लक्ष असते. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक अन्न पोटात जाते आणि त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. टीव्हीसमोर बसून जेवण करण्याच्या सवयीमुळे गंभीर आजार जडतात. रक्तदाब वाढणे, हाय - कोलेस्टेरॉल, मधुमेह, कमरेभोवती चरबी वाढणे या समस्या दिसून येतात.

बॉक्स

उदरविकाराची प्रमुख कारणे

बदललेली जीवनशैली उदरविकार वाढण्यास कारणीभूत ठरते. यात प्रामुख्याने जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल पाहण्याची वाईट सवयी जवळपास सर्वच वयोगटात लागली आहे. जेवणाकडे लक्ष नसेल तर अन्न किती वेळा चालवतोय ते नीट चावलं गेलंय का? याचे भान राहत नाही. अनेक वेळा तोंडातील घास संपलेला असतो. तरीही एकसारखे टीव्ही पाहण्यात मग्न असतात. त्यामुळे व्यवस्थित घास न चावता तसेच अन्न गिळल्याने व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे पोटाचे किरकोळ विकार सुरू होतात.

बॉक्स

पोटाचे विकार टाळायचे असतील तर...!

जेवण करताना मानसिक दृष्ट्या आपण त्यात गुंतणे आवश्यक आहे. टीव्ही, मोबाईल बघत जेवण सुरू असेल तर त्याचा पचनक्रियेवर भलताच परिणाम जाणवतो.

मानसिक दृष्ट्या जेवणात आपण एकरूप नाही झालो तर लाळ तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.

लाळ जेवढी चांगली जेवणात मिसळते. तेवढे चांगले पचन होते. तुमचे पोट चांगले असेल तरच एकूण आरोग्य चांगले राहते.

बॉक्स

मुले जेवत नाहीत म्हणून टीव्ही

कोट

मुलाने भरपूर जेवावं म्हणून मुलाला टीव्हीवर बसवून कार्टून लावून देतात. मुलेही कार्टून बघत जेवतात. पण ते त्यांच्या किती अंगी लागते, हा प्रश्नच आहे. आम्ही स्वयंपाकघरात जेवतो. त्यामुळे दिवसभरातील घडामोडींच्या गप्पा होतात.

- जयश्री देशमुख,

गृहिणी

कोट

मुलगी जेवत नसल्याने पालक त्यांना टीव्हीसमोर बसवून अथवा मोबाईल हातात देऊन घास भरवितात. यात मुलीचे जेवणाकडे कमी आणि टीव्ही, मोबाईलच्या स्क्रिनकडे अधिक लक्ष असते. त्यामुळे मुलीला पोटभर जेऊ घालावे लागते.

- दीपाली थोरात,

गृहिणी

कोट

पती कामावर गेल्यावर मी आणि बाळ आम्ही दोघेच घरी असतो. मोबाईलवर त्याच्या आवडीचे कार्टून लावल्याशिवाय तो जेवतच नाही. ही सवय शाळेत गेल्यावर माेडेल, असे वाटते. पण लाॅकडाऊनमुळे तेही शक्य होईना.

- कल्याणी मोरे,

गुहीनी

कोट

टीव्हीसमोर बसून जेवण केल्यामुळे लहान मुलांना पोटाचे विकार जसे कॉन्स्टीप्शन अपचन, तसेच लठ्ठपणा, डायबेटीसचे प्रमाण भारतात वाढीस लागले आहे. लहान मुलांना आई वडील आजकाल खेळण्यासाठी मोबाईल देण्याचे प्रमाण वाढले आहे. या गोष्टींना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. जेणेकरून मुलांचा स्क्रिन टाईम नियंत्रणात असावा.

- डॉ. धीरज सवाई,

बालरोग तज्ञ्ज्ञ

कोट

कोरोना काळात शाळा बंद असल्याने टीव्ही आणि मोबाईलचे आकर्षण वाढले आहे. त्याचमुळे टीव्ही बघून जेवण करतात. यात आपल्याला भूक किती, हे मुलांना कळत नाही. जास्तीचे जेवण एकाच वेळी होते. तसेच जंकफुडचे सेवन टीव्ही पाहताना अधिक प्रमाणात केले जाते. अती प्रमाणात असा आहार घेतल्यामुळे मुलांना बध्दकोष्टता, पित्त, अपचनाचे प्रमाण व स्थुलपणा अशा आजारांना सामोरे जावे लागतात. हे टाळण्यासाठी मुलांनी रोज व्यायाम, फायबर युक्त आहार व फळांचे सेवन करायला पाहिजे.

- डॉ.अमोल औगड,

बालरोगतज्ज्ञ

कोट

टीव्ही आणि मोबाईल आदी टेकनॉलॉजीमुळे जेवढी आताची पिढी स्मार्ट होत आहे, तेवढेच त्याचे दृष्परिणामदेखील होत आहेत. टीव्ही, मोबाईल लावून आहार घेताना गजरेपेक्षा अधिक किंवा अयोग्य प्रमाणात खाणे झाल्यामुळे स्थुलता आणि अपचन, उदरविकार वाढते. त्यापेक्षा त्यांना पुढील काळात लाईफस्टाईल टिसिजेस होण्याची शक्यता असते. आयुर्वैदीय आहार विहार पध्दतीनुसार किंवा थोडक्यात आपल्या पारंपरिक पध्दतीनुसार आपले जेवण आणि जेवणाच्या वेळा असण्यावर भर असावा. घरातील आजी, आजोबा यासाठी योग्य पथदर्शक ठरू शकतात.

- डॉ.अनिल बाजारे,

फॅमिली फिजिशयन

Web Title: Be careful if you are sitting in front of the TV eating; Fear of stomach upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.