बँकेची तिजोरी फोडली
By Admin | Updated: September 1, 2014 23:14 IST2014-09-01T23:14:52+5:302014-09-01T23:14:52+5:30
स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत अज्ञात चोरट्यांनी गॅसकटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून ७ लाख ७३ हजार ५६३ रुपये लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आली.

बँकेची तिजोरी फोडली
बेनोडा येथील घटना : ७ लाख ७३ हजारांची रोकड पळविली
बेनोडा (शहीद) : स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत अज्ञात चोरट्यांनी गॅसकटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून ७ लाख ७३ हजार ५६३ रुपये लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आली. सदर घटना दोन दिवसांच्या सुटीच्या काळात घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले होते.
बेनोडा शहीत येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. ग्रामीण भागात ही एकमेव सहकारी बँक आहे. शनिवार आणि रविवारची सुटी असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून आां प्रवेश केला. गॅसकटरचा वापर करुन तिजोरी फोडण्यात आली. तिजोरीतील ७ लाख ७३ हजार ५६३ रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. सोमवारी बँक मॅनेजर आणि कर्मचारी साडेदहा वाजता बँकेत आले असता समोरील कुलूप उघडून त्यांनी प्रवेश करताच बँकेत चोरी केल्याचे दिसले. तेव्हा शाखाप्रबंधक अरुण वानखडे यांनी तिजोरी पाहिली असता गॅस कटरने फोडून रक्कम लंपास केल्याचे दिसून आले. या घटनेची रीतसर तक्रार शाखा व्यवस्थापक अरुण वानखडे यांनी बेनोडा पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करुन अमरावतीवरुन श्वान पाक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी सिंगे यांनी घटनास्थळाला भेट दिली. बेनोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंविचे कलम ४५४, ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार ठाकरे, वरुडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी भेट देऊन तपास सुरु केला आहे. या बँकेत अशी घटना यापूर्वी दोन वेळा घडली, हे विशेष. पुढील तपास ठाणेदार ठाकरे करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देऊन नाकाबंदी करण्यात आली आहे. (वार्ताहर)