बँक कर्मचारी चौथ्यांदा संपावर
By Admin | Updated: December 6, 2014 00:35 IST2014-12-06T00:35:24+5:302014-12-06T00:35:24+5:30
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी वेतनवाढीच्या मुद्यावरुन शुक्रवारी पुन्हा एकदिवसीय संप पुकारल्याने दीड हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली होती.

बँक कर्मचारी चौथ्यांदा संपावर
अमरावती : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी वेतनवाढीच्या मुद्यावरुन शुक्रवारी पुन्हा एकदिवसीय संप पुकारल्याने दीड हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. वर्षभरात चवथ्यांदा बँक कर्मचारी संपावर गेले आहेत. बंदचा फटका अमरावतीकर ग्राहकांना सोसावा लागला. स्थानिक जयस्तंभ चौक येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेसमोर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने करुन सरकारविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला.
जिल्ह्यात १७ राष्ट्रीयीकृत बँका असून शुक्रवारी सकाळपासून युनायडेट फोरम आॅफ बँक युनियनच्या नऊ संघटनांमध्ये सहभागी बँक कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला. वाढीव वेतनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी संपाचे हत्यार उपसले. संपामध्ये सुमारे साडेतीन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. वर्षभरात चौथ्यांदा बॅक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने सामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागले. सुमारे २० लाख खातेदारांना बँक व्यवहार बंद ठेवावे लागल्याने ग्राहकांमध्ये वैताग दिसून आला. संपामध्ये जिल्हातील १८ राष्ट्रीयीकृत बँका, शेडयुल कमर्शियल बँक व खासगी बँकांनी सहभाग घेतला. त्यामुळे सुमारे दीड हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. एटीएमसमोर गर्दी दिसून आली.
दीड हजार कोटींची उलाढाल ठप्प
अमरावती : शुक्रवारी बँकेने संप पुकारल्यामुळे पैसे भरणे व काढणे ग्राहकांना शक्य झाले नाही. परिणामी अनेक खातेदारांची तारांबळ उडाली. या संपात आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोशियशनचे संघटक सचिव सुधीर लसनापुरकर, आॅफिसर असोशियनचे अध्यक्ष प्रदीप कराळे, नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक वर्कसचे अध्यक्ष चंद्रकांत खानझोडे, प्रमोद मुळे, मनोज वर्मा, चिन्मय कलोती, संजय देशपांडे, सचिन गायकवाड, भिमराव गजभिये, दिलीप लाडे, अब्दुल रौफ, संगीता पडोळे, चंद्रकांत मोहीते, युको बँकेचे प्रमोद मुळे, सुनील सोनवणे, प्रफुल्ल मेंटागे, आलोक रघुवंशी, शंशाक शिराळकर आदीचा सहभाग होता. यापूर्वी आॅक्टोबरमध्ये संप पुकारण्यात आला होता.