केळी, सीताफळ, डाळिंब, पेरुच्या जोडीला शेवगाही
By Admin | Updated: May 16, 2015 00:46 IST2015-05-16T00:46:06+5:302015-05-16T00:46:06+5:30
पिढ्यानपिढ्या व्यवसाय शेतीच. परंतु परंपरागत शेतीला फाटा देत संत्रा, पेरू, डाळिंब, शेवगा व सीताफळांचे उत्पन्न घ्यायला ..

केळी, सीताफळ, डाळिंब, पेरुच्या जोडीला शेवगाही
७० एकरांत संत्रा : निमखेड बाजारच्या संयुक्त रोंदळे कुटुंबाची यशोगाथा
गजानन मोहोड अमरावती
पिढ्यानपिढ्या व्यवसाय शेतीच. परंतु परंपरागत शेतीला फाटा देत संत्रा, पेरू, डाळिंब, शेवगा व सीताफळांचे उत्पन्न घ्यायला सुरुवात केली. दरवर्षी उत्पन्न वाढवायला लागले. आता या शेती व्यवसायातून वर्षाला कोट्यवधींची उलाढाल होत आहे. कुटुंबाच्या संयुक्त परिश्रमातून ११० एकरांत फळबागा फुलविणाऱ्या अंजनगाव सुर्जी तालुक्यामधील जगन्नाथराव रौंदळे परिवाराची यशोगाथा आजच्या समाजासाठी आदर्शवत आहे.
रोंदळे परिवाराजवळ तशी १४८ एकर शेती आहे. यामध्ये ११० एकरांत फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. प्रगत कृषिमंत्राचा वापर करुन या परिवाराने शेती ही एक प्रयोगशाळा बनविली आहे. शेतीमध्ये नवनवीन फळझाडांची लागवड करुन त्यांनी आपल्या भागात कुठलाही फलोत्पादन करु शकतो, हे सिध्द करुन दाखविला आहे. परिश्रमाला एकीचे बळ मिळाल्याने वैभव नांदते आहे. जगन्नाथरावांच्या परिवाराची दुसरी व तिसरी पिढी हे व्रत अंगीकारले आहे.
जिल्ह्यात पेरुच्या बागा, तशा विरळच, परंतु या परिवाराने ५ एकरामध्ये जी-विलास वाणाच्या पेरूची झाडे लावली आहेत. हे रोप लखनौ येथून आणले. ३५ ते ४० रुपये प्रतिरोप असा खर्च आला. ६ बाय ८ फूट अंतरामध्ये ४ हजार ८०० रोपे लावलीत. गर जास्त बी कमी हे वाणाचे वैशिष्ट्ये आहे. आज या झाडांना दोन वर्षे झालीत. दीड वर्षांपासून बहर यायला सुरुवात होते. मागील वर्षी एक बहर त्यांनी घेतला. प्रत्येक झाडाला १० ते १२ किलोंची फळे आहेत. नागपूर मार्केटमध्ये २२ ते २५ रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला. पहिला बहर हा उत्पादन खर्चात गेला आता झाडे मोठी होत आहे. तशी फळांची संख्याही वाढत आहेत. येणारा प्रत्येक बहर अधिकाअधिक उत्पन्न देणार आहे. वर्षाला पेरुचे दोन बहर घेता येतात. फळ तोडणी झाल्यानंतर झाडांची छाटणी करावी लागते. या छाटणीनंतर पुन्हा बहर येतो असे राहुल रौंदळे यांनी सांगितले. या फळपिकांसांठी प्रामुख्याने शेणखताचा वापर करण्यात येतो.
या परिवाराने ७ एकरामध्ये बालानगर वाणाच्या जातीचे सीताफळ लागवड केली आहे. १० वर्षांपूर्वी धडासाने ही लागवड केली. १३ बाय १३ फूट अंतरावर झाडे लावलीत. सीताफळाला तसा उत्पादन खर्च कमी आहे. दरवर्षी एक बहर येतो, असे राहुलने सांगितले.
६ एकरामध्ये जी-नाईन या वाणाची केळी लावली. १४ रुपये प्रति बुंध्याप्रमाणे ९००० बुंधे लागलेत. वर्षभरात दोन बहर घेता येतात. दोन वर्षांचे पीक आहे. या वाणाचा बुंंधा जाडा असून फळे अधिक लागतात. अडीच एकरात डाळिंबाची लागवड केली आहे. भगवा वाणाचे जालण्यावरुन रोपे आणली. १० बाय १५ फूट अंतरात लागवड केली. मागच्या वर्षी पहिला बहर घेतला. सध्या एका झाडाला १०० ते १२० फळे आहे. फळांचे वजन ७० ते १२० ग्रॅम पर्यंत आहे. याशिवाय एका एकरामध्ये शेवग्याची लागवड केली. झाडे ३ वर्षांची झाली आहेत. वर्षाला एक बहर येतो. तसा उत्पादनखर्च कमी येतो. मार्च ते जून महिन्यात उत्पादन होते. स्थानिक बाजारात ४० ते ५० रुपये प्रति किलोचा भाव मिळतो. या परिवाराच्या दुसऱ्या पिढीचे गणेशराव, रामेशराव, सुरेशराव, दिनेश व संजय असे ५ भाऊ संयुक्तपणे राहतात व शेतात राबतात. नवीन पिढीच्या राहुल याने शेती हाच व्यवसाय स्वीकारला आहे. संयुक्त परिवाराच्या परिश्रमाने रौंदळे परिवाराकडे वैभव नांदत आहे.