बच्चू कडू - रवि राणा पुन्हा आमने-सामने; प्रकरण पोहोचले पोलिसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2022 22:58 IST2022-10-23T22:57:36+5:302022-10-23T22:58:21+5:30
आ. कडू यांच्या तक्रारीनुसार, आमदार राणा यांनी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० च्या सुमारास सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात बदनामीकारक जाहीर वक्तव्य केले. मला असे वाटते की, बच्चू कडू सोंगाड्या आहे. त्याला कुठल्याही प्रकारची मानमर्यादा नाही. मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. बच्चू कडू जे आंदोलन करतो, ते फक्त तोडीसाठीच करतो. तोडीबाज म्हणून त्याची ओळख आहे,

बच्चू कडू - रवि राणा पुन्हा आमने-सामने; प्रकरण पोहोचले पोलिसात
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : माजी राज्यमंत्री तथा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी रविवारी आमदार रवी राणा यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. २३ ऑक्टोबर रोजी भादंविच्या कलम ५०१ अन्वये राणांविरोधात ती एनसी दाखल करण्यात आली.
आ. कडू यांच्या तक्रारीनुसार, आमदार राणा यांनी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० च्या सुमारास सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात बदनामीकारक जाहीर वक्तव्य केले. मला असे वाटते की, बच्चू कडू सोंगाड्या आहे. त्याला कुठल्याही प्रकारची मानमर्यादा नाही. मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. बच्चू कडू जे आंदोलन करतो, ते फक्त तोडीसाठीच करतो. तोडीबाज म्हणून त्याची ओळख आहे, असे राणा यांनी सोशल मीडियावर म्हटल्याचे आ. बच्चू कडू यांनी तक्रारीत म्हटले आहे. राणा यांनी अनेकवेळा बदनामीकारक वक्तव्य केल्याचेही कडू यांनी नमूद केले आहे. राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी आ. कडू यांची तक्रार नोंदवून घेतली.
तर जशाच तसे उत्तर देवू : रवी राणा
आमदार बच्चू कडू जे काही करतात ते मला सांगायची गरज नाही. त्यांना सिद्धांत, विचार नाही. जे काही ते करतात, ते तोडपाणीसाठीच. दुसऱ्यांना दम देतात, गलिच्छ, बेछूट बोलतात. ते ज्या स्तरावर जातील, त्या स्तरावर मलाही जाता येते. मी खिसे कापून किराणा वाटप करतो, हे अगोदर सिद्ध करावे, असे आ. रवी राणा ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. आ. कडू यांचे आंदोलन ताेडपाणीसाठीच असते. यापूर्वी सोफिया प्रकल्पाचे आंदोलन सर्वांनाच माहिती आहे. आमचे आंदोलन शेतकरी, गरिबांसाठी झाले, दिवाळीत जेलमध्ये गेलो, हा इतिहास आहे. आमदार कडूंनी अरेरावीची भाषा बंद करावी, मी धमकीला भीत नाही, असे थेट आव्हान आ. रवी राणा यांनी दिले.