बाजार समित्यांमध्ये राहणार बच्चू कडूंचा ‘डेरा’
By Admin | Updated: May 4, 2017 00:16 IST2017-05-04T00:16:15+5:302017-05-04T00:16:15+5:30
बाजार समितीच्या अधिनियम २९ अन्वये यार्डातली तूर हमी भावानेच विक्री व्हावी. ही जबाबदारी बाजार समितीचे सचिव व संचालक मंडळाची आहे.

बाजार समित्यांमध्ये राहणार बच्चू कडूंचा ‘डेरा’
१० मे रोजी आंदोलन : बाजारभावाने तूर खरेदी करा
अमरावती : बाजार समितीच्या अधिनियम २९ अन्वये यार्डातली तूर हमी भावानेच विक्री व्हावी. ही जबाबदारी बाजार समितीचे सचिव व संचालक मंडळाची आहे. अन्यथा संचालक मंडळ बरखास्तीची कार्यवाही अधिनियमात आहे. त्यानुसार हमी भावानेच तूर खरेदी व्हावी यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये १० मे रोजी ‘डेरा’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आ. बच्चू कडू यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
बुद्ध पौर्णिमेपासून हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येईल व नंतर क्रांतीच्या मार्गाने संघर्ष करू. हमीभाव शुल्क नियमक समितीने ६०५० रुपये तुरीचे हमीभावची शिफारस केली असताना केंद्राने ५०५० रुपये हमी भाव जाहीर केला ही शोकांतिका आहे. बाजार समितीच्या आवारात रोज हमीपेक्षाने कमी भावाने तुरीची खरेदी होत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा मोडीत असल्याचा आरोप आ. बच्चू कडू यांनी केला.
नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीन वर्षे दुष्काळात गारद झाल्यानंतर यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी सुखकर ठरत असताना भाव पाडल्याने गारद झाले. शासन शेतमालाचे वाढलेले भाव कायम ठेवत नाही व कमी झालेले वाढवत नाही. गतवर्षी १२ हजार रुपये असणारी तूर यंदा ३ हजारावर येते कशी असा सवाल त्यांनी केला. २००६ पासून निर्यात बंदी आहे. त्यामुळे विदेशात तूर जात नाही व आयात शुल्क नाही व यावर शासनाचे निर्बंध नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे भाव कोसळत असल्याचे आ. कडू यांनी सांगितले. पत्रपरिषदेला रोशन देशमुख, प्रदीप वडतकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री करताहेत शेतकऱ्यांना संभ्रमित
बाजार समितीमध्ये असलेल्या केंद्रामध्ये व्यापाऱ्यांच्या तूर विक्रीमुळे ४०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ते शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचा भ्रष्टाचारच झाला नसल्याचे आ. कडू यांनी सांगितले.