बाळाला जन्म दिल्यानंतर बाळंतीण बेपत्ता
By Admin | Updated: May 20, 2015 01:09 IST2015-05-20T01:09:51+5:302015-05-20T01:09:51+5:30
गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर बाळंतीण बेपत्ता झाल्याच्या घटनेमुळे डफरीन रुग्णालयात सोमवारी मध्यरात्री खळबळ उडाली.

बाळाला जन्म दिल्यानंतर बाळंतीण बेपत्ता
अमरावती : गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर बाळंतीण बेपत्ता झाल्याच्या घटनेमुळे डफरीन रुग्णालयात सोमवारी मध्यरात्री खळबळ उडाली. कुटुंबीय व गाडगेनगर पोलीस महिलेची शोधाशोध करीत आहेत.
अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी सुवरता किशोर इंगळे (२४) ही ९ महिन्याची गर्भवती असल्याने तिला आईने जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले होते. तिचे १६ मे रोजी सिझर झाले असून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याला एनआयसीयू कक्षात ठेवण्यात आले. सिझर झालेल्या सुवरतावर वॉर्ड क्रमांक ३ मध्ये उपचार सुरुच होता. मात्र, दोन दिवसांनंतर १८ मे रोजी सायंकाळनंतर सुवरता बेपत्ता झाली. ही बाब कळताच डफरीनचे वैद्यकीय अधीक्षक अरुण यादव यांच्या नेत्तृत्वात कर्मचारी व परिचारिकांनी सोमवारी रात्री रुग्णालय परिसर पिंजून काढला. पहाटे ४ वाजेपर्यंत वैद्यकीय अधीक्षकासंह सुरक्षा रक्षकांनी सुवरताचा शोध घेतला. मात्र, कुठेही शोध लागला नाही. तिच्या नातेवाईकांची चौकशी डफरीन प्रशासन करीत आहेत. सुवरता कुठे व कशासाठी गेली किंवा तीने पलायन तर केले नाहीना, याबद्दल शंकाकुशका व्यक्त होत आहेत.
सुवरताचा मुलगा एनआयसीयूत
अमरावती : जन्मदात्री आई बाळाला सोडून जावू शकत नाही, अशी स्त्रियांची भावना आहे. मात्र सुवरता स्वत: पळून गेली की, तिला कुणी पळवून नेले यांचे निश्चित कारण अद्याप कळले नाही. सुवरताचा भाऊ सतीश देवेंद्र वानखडे (रा. तोंडगाव, परतवाडा) याने मंगळवारी सकाळी गाडगेनगर पोलिसांकडे सुवरता हरविल्याची तक्रार नोंदविली आहे. नातेवाईक व पोलीस सुवरताचा शोध घेत आहेत.
सुवरताचे सिझर झाल्यावर तिने गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र. मुलाची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याला अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले होते. दोन दिवसांनंतर सुवरता बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांना काळजी लागली आहे. दोन दिवसांच्या बाळाची आईच बेपत्ता झाल्याने त्या निरागस जीवावर मोठे संकट ओढावले आहे. (प्रतिनिधी)