पंधरा दिवसांच्या सुटीत हत्तींवर आयुर्वेदिक चॉपिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST2020-12-17T04:39:13+5:302020-12-17T04:39:13+5:30

फोटो - आहे उपचार पद्धती, लक्ष्मी, सुंदरमाला, चंपाकली, जयश्री पर्यटकांच्या सेवेत नरेंद्र जावरे - परतवाडा - १ डिसेंबरपासून पंधरा ...

Ayurvedic chopping on elephants during fortnight vacation | पंधरा दिवसांच्या सुटीत हत्तींवर आयुर्वेदिक चॉपिंग

पंधरा दिवसांच्या सुटीत हत्तींवर आयुर्वेदिक चॉपिंग

फोटो - आहे

उपचार पद्धती, लक्ष्मी, सुंदरमाला, चंपाकली, जयश्री पर्यटकांच्या सेवेत

नरेंद्र जावरे - परतवाडा - १ डिसेंबरपासून पंधरा दिवस सुटीवर गेलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चारही हत्तीणी १६ डिसेंबर बुधवारपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाल्या. वर्षातून एकदा हत्तीच्या पायावर आयुर्वेदिक उपचार पद्धत असलेली चॉपिंग करण्यात आली

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत सेमाडोह परिक्षेत्रात लक्ष्मी सुंदरमाला चंपाकली व जयश्री या चार मादा हत्ती आहेत. गेल्या काही वर्षापासून जंगलाची सुरक्षा व वनविभागाच्या विविध कामांत दिमतीसह गस्त करणे, ओंडके वाहून नेणे यासाठी त्यांना वापरले जात होते. मात्र, दोन वर्षांपासून मेळघाटचे स्वर्ग असलेल्या कोलकास येथे पर्यटकांसाठी हत्ती सफारी सुरू करण्यात आली आहे. मेळघाटात पर्यटनाला येणारे पर्यटक मोठ्या हौसेने हत्ती सफारी करीत निसर्गसौंदर्याचा आनंद घेतात.

बॉक्स

अशी केल्या जाते चॉपिंग

वर्षातून एकदा या चारही हत्तीणींवर चॉपिंग केले जाते. पायांना पडलेल्या भेगांच्या विशेष देखभालीसाठी पंधरा दिवस त्यांची काळजी घेतली जाते. हिरडा, बिबा, बरडा, सुंठ, बेहडा, त्रिफळा, फल्ली तेल, डिकामाली, ओवाफूल, असमंतरा, नील मोम, साबण, विलायची, तुरटी, काथ, हिंग, जायफळ, सागरगोटी मांजू फळ अशा विविध आयुर्वेदिक साहित्याचा लेप केला जातो. पहाटेच्या कोवळ्या सूर्यकिरणात एका पिंपात आगीवर तयार करण्यात आलेला हा आयुर्वेदिक लेप हत्तींच्या पायांना लावण्यात येतो. तब्बल पंधरा दिवस हा उपचार केला जात असल्याची माहिती सेमाडोहचे वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

--------------

पंधरा दिवसांनंतर झाल्या कामावर रुजू

सामान्य माणसाप्रमाणेच हत्तीणींचासुद्धा दिनक्रम आहे. सुंदरमाला, चंपाकली, लक्ष्मी, जयश्री यांचा जेवण, नदीत आंघोळ, विश्रामाचा वेळ ठरलेला आहे. त्यानुसारच महावत पंडोले, वनरक्षक परमानंद अलोकार, अमित गोफणे, जायभाये व नियुक्त वनकर्मचारी त्यांची देखभाल करतात. १ डिसेंबर रोजी सुटीवर गेलेले हे हत्ती १६ डिसेंबरपासून पुन्हा पर्यटकांच्या सेवेत रुजू झाले आहेत. पर्यटकांचा चांगला प्रतिसाद या हत्ती सफारीला मिळत आहे, हे विशेष.

कोट

१ डिसेंबरपासून चारही हत्ती सुटीवर होते. यादरम्यान त्यांच्या पायांवर चॉपिंग करण्यात आले. १६ डिसेंबरपासून पुन्हा हत्ती सफारीसाठी पर्यटकांच्या सेवेत रुजू झाले आहेत.

- सम्राट मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी, सेमाडोह

Web Title: Ayurvedic chopping on elephants during fortnight vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.