वरूडमध्ये महावितरण महाकृषी ऊर्जा अभियानाचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST2021-03-13T04:23:50+5:302021-03-13T04:23:50+5:30
सायकल रॅली, १ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान 'कृषी ऊर्जा पर्व' वरूड : कृषिपंपांच्या थकबाकीत व्याज, विलंब आकार माफ ...

वरूडमध्ये महावितरण महाकृषी ऊर्जा अभियानाचा जागर
सायकल रॅली, १ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान 'कृषी ऊर्जा पर्व'
वरूड : कृषिपंपांच्या थकबाकीत व्याज, विलंब आकार माफ करून सुधारित थकबाकीत ५० टक्के माफी देणारे महावितरणचे कृषी वीज जोडणी धोरण २०२० चा जागर अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या नेतृत्वात सायकल रॅलीने करण्यात आला.
वरूड येथे शुक्रवारी सकाळी घेण्यात आलेल्या या जागर रॅलीत मोर्शी विभागाचे कार्यकारी अभियंता भारतभूषण औगड, उपकार्यकारी अभियंता राजेश दाभाडे, दातीर यांच्यासह महावितरणचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाली होते. मुख्य रस्त्यासह मुख्य चौकातून मार्गक्रमण करणाऱ्या सायकल रॅलीने महाकृषी कृषी ऊर्जा धोरणात सहभागी होऊन वर्षानुवर्षे असलेल्या थकबाकीच्या ओझ्यातून मुक्त होण्याचे संदेश देण्यात आले. याशिवाय ६०० मीटर अंतरापर्यंत वीज वाहिन्यांव्दारे काही अटींवर नवीन वीज जोडणी, सौर कृषी पंपाव्दारे दिवसाला वीज जोडणी आदी महाकृषी अभियानांतर्गत असलेल्या योजनांचाही यावेळी जागर करण्यात आला. महावितरणचे कृषी ऊर्जा धोरण शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्त करणारे आहे. त्यामुळे या अभियानाच्या लाभापासून कुणीही वंचित राहू नये, याची माहिती जिल्ह्याच्या सर्व कृषी ग्राहकांना मिळावी, यासाठी १ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान महावितरणचे 'कृषी ऊर्जा पर्व' राज्यभर राबविण्यात येत असून, कृषी पर्वाच्या माध्यमातून १८ कलमी कार्यक्रमाव्दारे महाकृषी अभियानाची जनजागृती करण्यात येत आहे. थकबाकीदार ग्राहकांना ६६ टक्के सवलत असणारे महावितरणचे कृषी धोरण शेतकऱ्यांची थकबाकी शून्य करणारे तर आहेच, शिवाय वसूल झालेल्या थकबाकीतून ग्रामीण वीज जाळे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.
------------