४७ हजार व्यक्तींचे प्रबोधन, ३७५६ तंबाखूमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:07+5:302021-05-30T04:11:07+5:30

अमरावती : तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी राबविलेल्या सत्रांच्या परिणामी जिल्ह्यातील ३७५६ व्यक्तींनी तंबाखू सेवन कायमस्वरूपी सोडले आहे. ...

Awakening of 47,000 persons, 3756 tobacco free | ४७ हजार व्यक्तींचे प्रबोधन, ३७५६ तंबाखूमुक्त

४७ हजार व्यक्तींचे प्रबोधन, ३७५६ तंबाखूमुक्त

अमरावती : तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी राबविलेल्या सत्रांच्या परिणामी जिल्ह्यातील ३७५६ व्यक्तींनी तंबाखू सेवन कायमस्वरूपी सोडले आहे. तंबाखू नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत २०१७ पासून करण्यात येत असलेल्या कार्याची ही फलनिष्पत्ती आहे.

अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम २०१७ पासून राबविण्यात येत आहे. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. सदस्य सचिव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आहेत. जिल्हा सल्लागार डॉ. मंगेश गुजर, समुपदेशक उद्धव जुकरे, सामाजिक कार्यकर्ते पवन दारोकार यांचा समितीत समावेश आहे.

जिल्हा व तालुका स्तरावर एकूण १७ समुपदेशन केंद्रे असून, २०१७ पासून त्यांच्याकरवी ४७ हजार ३०२ व्यक्तींचे तंबाखूचे व्यसन सोडविण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत ३७५६ व्यक्तींनी हे व्यसन कायमस्वरूपी सोडल्याचे सदस्य सचिव डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.

----------------

दोन वर्षांत दोन कोटींची जप्ती

अन्न व औषध विभागामार्फत २०१८ पासून तंबाखूजन्य पदार्थ वाहतूक व विक्रीप्रकरणी करण्यात आलेल्या १३९ कारवायांमध्ये जप्त मुद्देमाल २ कोटी २१ लाख ६ हजार ७६२ रुपयांचा आहे. याशिवाय २०१७ पासून तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १६५२ लोकांकडून २ लाख ७३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

----------------

विद्यार्थ्यांचे समुपदेशन

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत २०१७ पासून २९० शाळांमध्ये ७३ हजार ४३७ विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. याशिवाय पोलीस, राज्य व प्रादेशिक परिवहन, शिक्षण, ग्रामसेवक, वकील, विस्तार अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आशा, अन्न व औषध विभाग यांच्याकरिता ३३ सत्रांमध्ये १२७७ सहभागी प्रशिक्षणार्थींना तंबाखू नियंत्रण कायदा-२०१३ बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

---------------

तंबाखू नियंत्रण कायद्यातील तरतुदी

२००३ मध्ये अस्तित्वात आलेल्या तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा-२००३) अंतर्गत कलम ४ अन्वये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे. कलम ५ अन्वये तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी आहे. कलम ६ (अ) अन्वये १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखून्य पदार्थ विकण्यास बंदी, तर कलम ६ (ब) अन्वये शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात असे पदार्थ विक्रीस बंदी आहे. कलम ७ अन्वये सर्व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टणावर निर्देशित धोक्याची सूचना देणे बंधनकारक आहे.

-------------------

Web Title: Awakening of 47,000 persons, 3756 tobacco free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.