‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’मुळे शेतकरी नापास, दरवाढीच्या प्रतीक्षेत पांढऱ्या सोन्यात तूट
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 3, 2023 16:59 IST2023-06-03T16:58:15+5:302023-06-03T16:59:45+5:30
क्विंटलमागे दीड हजारांचा फटका

‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’मुळे शेतकरी नापास, दरवाढीच्या प्रतीक्षेत पांढऱ्या सोन्यात तूट
अमरावती : दरवाढ मिळण्यासाठी सबुरीचा सल्ला देणारे व्हॉट्सॲप मेसेजनुसार कापूस शेतकऱ्यांनी साठवून ठेवला आणि दरवाढीच्या प्रतीक्षेत क्विंटलमागे दीड हजारांचा फटका बसला. आता व्यापाऱ्यांनी नफेखोरीसाठी भाव पाडल्याने याच भावात कापूस विकावा लागत आहे.
गतवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात कापसाला क्विंटलमागे १३ हजारांवर भाव मिळाला होता. त्यामुळे खरिपामध्ये कपाशीची क्षेत्रवाढ झाली. मात्र, अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झाले. याशिवाय बोंडसड व गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावानेही सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार गतवर्षीच्या हंगामात हेक्टरी २३५.२९ किलो रुई झाली. पाच वर्षातील हे सर्वात कमी उत्पादन आहे. शेतकऱ्यांना बाजारभावाचा अंदाज देणारी शासनयंत्रणा नाही. त्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेत शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली होती.