गर्दी टाळा; उत्सवकाळात दक्षतेचा विसर पडू देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:57+5:302021-09-09T04:17:57+5:30
अमरावती : नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हेच सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव आदी उत्सवकाळातही दक्षतेचा विसर पडता कामा नये. ...

गर्दी टाळा; उत्सवकाळात दक्षतेचा विसर पडू देऊ नका
अमरावती : नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हेच सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव आदी उत्सवकाळातही दक्षतेचा विसर पडता कामा नये. केरळमध्ये रोज हजारो नवे रुग्ण आढळत असून, हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे दक्षता पाळली गेली, तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही, असा इशारा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिला. कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी दक्षता नियमांचे काटेकोर पालन करण्याचे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, अमेरिका, चीन आदी देशांत तिसरी लाट उद्भवली असून, केरळमध्येही रोज नवे हजारो रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर आपल्याला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे; पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये, यासाठी उत्सवकाळातही दक्षतेचा विसर पडता कामा नये.
आरोग्याची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले, तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तरच पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. आपण सर्वांनी मिळून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करायला हवे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल, तर शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन व्हावे. गर्दी व सार्वजनिक कार्यक्रम टाळावे.
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशालादेखील यातून जावे लागले होते. महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. आता तो रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्स, स्वच्छता आदी दक्षता नियम पालनाची व स्वयंशिस्तीची गरज आहे. त्यामुळे सर्वांना स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.