‘त्या’ वाघिणीच्या हालचाली टिपण्याचे प्रयत्न
By Admin | Updated: April 12, 2015 00:18 IST2015-04-12T00:18:06+5:302015-04-12T00:18:06+5:30
पोहरा मार्गावरील मालखेडच्या जगंलात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

‘त्या’ वाघिणीच्या हालचाली टिपण्याचे प्रयत्न
वनविभाग सतर्क : पाणवठे, निर्जनस्थळी लावले ट्रॅप कॅमेरे
अमरावती : पोहरा मार्गावरील मालखेडच्या जगंलात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाने पाणवठे व निर्जनस्थळी ट्रप कॅमेरे वाढविले असून वाघिणीच्या हालचालीचे निरीक्षण सुरु केले आहे. हे पट्टेदार वाघीण वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातील असून ती अमरावतीच्या जगंलात वास्तव्यास आली आहे.
चांदूररेल्वे मार्गावर पोहरा जगंलाचा भाग असून मालखेड गावाजवळ जगंल आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी मालखेड जंगलात गस्तीवर असणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना पट्टेदार वाघिणीच्या पायाचे ठसे आढळून आले होते. त्यामुळे वाघिणीचे वास्तव्य असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. हा वाघ कोठून आला व कशासाठी आला याचे निरीक्षण करण्यासाठी वनविभागाने जगंलातील पानवठे व निर्जनस्थळी ट्रॅप कॅमेरे लावले आहे. तीन दिवसांपासून वाघाच्या हालचालींवर वनविभागाने लक्ष केंद्रित केले असता एका ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ फिरत असताना आढळून आला आहे. ही वाघीण कोठून आली? याचा शोध घेण्याकरिता वनविभागाने वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातील वनविभागाशी संपर्क केला. तेथील पट्टेदार वाघाच्या अंगावरील काळे-पिवळे पट्टे व अमरावतीच्या जंगलात आढळलेल्या वाघाच्या अंगावरील काळे-पिवळे पट्टयाची तुलना करण्यात आली. त्यामध्ये अमरावतीच्या जंगलात आढळलेली वाघीण ही बोर अभयारण्यातीलच असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाघीण ही दुसऱ्या ठिकाणच्या जंगलात जाऊन स्वत:चे वास्तव्य सिध्द करीत असते. त्यासाठी ती अमरावतीच्या जंगलात वास्तव्यास आली असावी, असा तर्क वनविभाग व काही वन्यजीव अभ्यासकांनी काढला आहे.
उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात शिकारी प्रतिबंधक पथकाचे डब्ल्यू. शेख, पी.टी.वानखडे, अमोल गावनेर, फिरोज खान, सतीश उमक, चंदू ढवळे, मनोज ठाकूर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पोहऱ्याजवळील मालखेड जंगलात वाघीण आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. वाघिणीच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून वनकर्मचारी जंगलात २४ तास गस्त घालत आहेत. ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये जंगलात फिरताना काही नागरिक आढळून आले आहेत. त्यांची चौकशी वनविभागाने सुरु केली असून नागरिकांची जंगलातील भ्रमंती वाघांसाठी धोकादायक ठरु शकते, असा इशारा वनविभागाने दिला आहे.
अमरावतीच्या जंगलात आढळलेली वाघीण बोर अभयारण्यातील असल्याचे निदर्शनास येत आहे. वाघिणीच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनीही जंगलात ये-जा करणे टाळावे. तसेच सावधगिरी बाळगावी. वाघ दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क करावा.
- संजीव गौड,
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक).