कृषी साहित्य चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद, ८० हजारांचे साहित्य जप्त
By प्रदीप भाकरे | Updated: November 7, 2023 16:35 IST2023-11-07T16:34:47+5:302023-11-07T16:35:36+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कृषी साहित्य चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद, ८० हजारांचे साहित्य जप्त
अमरावती : दत्तापूर ठाण्याच्या हद्दीतील कासारखेडा येथील एका शेतातून मोटारपंप, केबल व पाइप चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमरलाल सोमलाल चिलाटे (३८) रा. अर्धमणी, मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. २४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी कासारखेड शिवारातील एका शेतातून मोटारपंप, केबल व पाइप चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.
तपासात सदर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक एमएच २७ डिजे २०५७ ही अमरलाल चिलाटे हा वापरत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पथकाने त्याला यावली येथून ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम व मुलचंद भांबुरकर, पुरुषोत्तम यादव, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, योगेश बोचरे यांनी केली.