जीवे मारण्याचा प्रयत्न; पाच वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:50 IST2019-08-29T00:49:14+5:302019-08-29T00:50:01+5:30
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी (फालके) यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला. सुरेश भगवान नितनवरे (५२ रा.मांजरी म्हसला) असे गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी म्हसला ते सातरगाव मार्गावर २ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता घडली होती.

जीवे मारण्याचा प्रयत्न; पाच वर्षे सश्रम कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कुऱ्हाडीने एका महिलेवर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी (फालके) यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला. सुरेश भगवान नितनवरे (५२ रा.मांजरी म्हसला) असे गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी म्हसला ते सातरगाव मार्गावर २ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता घडली होती.
विधी सूत्रानुसार, धम्मपाल प्रल्हाद गजभिये (३७, रा. मांजरी म्हसला) हे २ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी पत्नी सोनू (३०), मुलगा व मुलीसह दुचाकीने मांजरी म्हसला ते सातरगाव मार्गावरील शेतात जात होते. त्यांना सुरेश नितनवरे नामक इसमाने रस्त्यात अडविले. पूर्ववैमनस्यातून सुरेशने धम्मपालवर कुºहाने हल्ला चढविला. त्याने चुकविलेला वार दुचाकीवर मागे बसलेल्या पत्नी सोनू यांच्या डोक्यावर बसला. त्या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलीसांनी आरोपी सुरेशविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. तपास पूर्ण करून पोलिसांनी २७ ऑक्टोबर २०१६ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी (फालके) यांच्या न्यायालयात सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश भागवत यांनी आठ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर आरोपीचा दोष सिद्ध झाला. न्यायालयाने सुरेश नितनवरेला पाच वर्षांचा सश्रम कारावास, १० हजारांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.