वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे पडेल महागात; जावे लागेल तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 13:28 IST2025-03-01T13:27:24+5:302025-03-01T13:28:25+5:30
Amravati : जिल्ह्यातील ३ हजार ग्राहकांची वीज कापली

Attacking electrician can be costly; You have to go to jail
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महावितरण कार्यालयाने थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी वीज बिल भरलेले नाही, अशांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वेळा वीज तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ग्राहकांकडून हल्ला केल्याच्या घटना घडतात. मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात अशा चार घटना घडल्या असून, दोघांविरुद्ध एफआयआर करण्यात आल्याची माहिती महावितरण कार्यालयाने दिली.
महावितरणने थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. फेब्रुवारीच्या २० दिवसांत बिल भरण्यास सहकार्य न करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील ३ हजार ८८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. एकूण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार नाही. आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या कालावधीत वसुलीचे महावितरणन कंपनीसमोर आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
दोन महिन्यांत महावितरणच्या ४ कर्मचाऱ्यांवर हल्ले
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांमध्ये वीज बिलाच्या वसुलीदरम्यान चार ते पाच कर्मचाऱ्यांवर ग्राहकांनी, तसेच नातेवाइकांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात काहींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात महावितरणची थकबाकी किती
जानेवारी अखेर जिल्ह्यातील कृषी ग्राहक, पाणीपुरवठा व पथदिव्यांचे ग्राहक वगळून परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ११० कोटी ७५ लाखांचा समावेश आहे. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात ३८ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे.
परिमंडळात २३१ कोटीची थकबाकी
अमरावती परिमंडळा अंतर्गत अमरावती व यवतमाळ असे दोन जिल्हे येतात. या दोन्ही जिल्ह्यात महावितरण कंपनीची २३१ कोटी ५२ लाख रूपयांची थकबाकी वीज ग्राहकांकडे आहे.
काय होऊ शकते हल्लेखोरांवर कारवाई?
जर वीज कर्मचाऱ्यावर वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी हल्ला करण्यात आल्यास संबंधित ग्राहकांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो.
हल्लेखोरांवर काय कारवाई करण्यात आली आहे.
वीज कनेक्शन तोडल्यामुळे कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी संबंधित ग्राहकांच्या विरोधात पोलिस कारवाई करण्यात आली आहे.
हल्ल्याचे मुख्य कारण काय?
- वीज का तोडली : वीज कर्मचाऱ्यांवरील सर्वाधिक हल्ले हे वीज तोडल्यामुळे होते. वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.
- वारंवार वीज जाणे: उन्हाळ्याच्या ३ दिवसांमध्ये वारंवार वीज जाण्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे यातून होणाऱ्या ग्राहकांमध्ये मनस्ताप वाढून कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडतात.
- वाढीव वीज बिल : महावितरणकडून अनेक वेळा फॉल्टी मीटरमुळे वाढीव वीज बिल देण्यात येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या असतात. यातूनही अनेकवेळा रोष व्यक्त केला जातो.
"ज्या वीज ग्राहकांकडे बिल थकीत आहे, अशांकडून बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी देखील वीज तोडणीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वीज बिल भरून सहकार्य करावे."
- दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता