लोकमत न्यूज नेटवर्कआसेगावपूर्णा : सोयाबीन कापणीचा हंगामात सतत पाऊस सुरू असल्याने कापणी व मळणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. अशा परिस्थितीत शेतातील उभ्या सोयाबीनला कोंब फुटत असल्याने खरिपाचा हंगाम धोक्यात आल्याचे चित्र आहे.
काही दिवसांतच सोयाबीन कापून घरात येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसाने शेतात तलाव साचले. पाण्याच्या निचऱ्याअभावी सोयाबीन पीक खराब होण्याच्या मार्गावर असून, तुरीचे पीक पिवळे तर कपाशीची परिस्थिती फारच वाईट झाली आहे.
आसेगावपूर्णासह विरूळपूर्णा, दहीगावपूर्णा, धानोरापूर्णा, गोविंदपूर, राजनापूर्णा परिसरात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. सुरुवातीपासून पाऊस चांगला बरसल्याने पीकसुद्धा चांगले बहरले. मात्र काही दिवसांपासून सततच्या पावसाने शेतातील उभ्या असलेल्या सोयाबीन पिकांच्या शेंगांमधून मधून अंकुर दिसून येत आहे.
शासन मदतीसह पीक विमा परतावा मिळावा
पावसाने सोयानीनचे पीक पिवळे पडून हातचे गेले आहे. काही ठिकाणी जागेवरच सडले तर कुठे शेगांना अंकुर निघत आहे. त्यामुळे शासन मदतीसह पीक विमा परतावा मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
"यावर्षी कर्ज काढून शेती उभी केली. मात्र सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांसमोरच उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सर्वेक्षण करून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्यावी."- विकास इंगळे, शेतकरी, विरूळपूर्णा.