भिंत कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांसह अधीक्षिका निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:15 IST2025-07-31T18:14:05+5:302025-07-31T18:15:41+5:30
Amravati : दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, माजी आमदार राजकुमार पटेलांची मागणी, नातेवाईकांचा आक्रोश

Ashram school principal and superintendent suspended after wall collapse kills student
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील अनुदानित आश्रमशाळेतील अपघाताच्या अनुषंगाने शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधीक्षिका यांना बुधवारी निलंबित केले. पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून मंगळवारी झालेल्या अपघातात १४ वर्षीय विद्यार्थिनी सुमरती सोमा जामुनकर (रा. गांगरखेडा,) ही ठार झाली, तर तीन अन्य विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. नवव्या वर्गाची राधिका हिरा जामुनकर (१५), आठवीची राणी मुंगसा धांडे (१४, दोघीही रा. बिबारावखारी) व नववीची अनिषा भुऱ्या सेलूकर (१५, रा. मेहरून, ता. चिखलदरा) अशी उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणीच्या अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य बघता बुधवारी अचलपूर उपजिल्हा रुग्णालय गाठले. अपघाताची सर्वकष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान मंगळवारी सायंकाळी मृत्युमुखी पडलेली विद्यार्थिनी सुमरतीच्या पार्थिवाचे शवविच्छेदन बुधवारी दुपारपर्यंत केले गेले नव्हते. तिचा मृतदेह एका कॉटवर तसाच पडून होता. एवढेच नव्हे, तर शवविच्छेदनगृह कुलूपबंद होते. यावर पालकांनी व तिच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. दरम्यान, माजी आमदार राजकुमार पटेल अचलपूर रुग्णालयात दाखल झालेत. त्यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला. अपघाताची चौकशी करून दोर्षीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चौकशीकरिता दोन स्वतंत्र समित्या
अपघाताची चौकशी दोन स्वतंत्र समित्यांमार्फत केली जाणार आहे. मृत विद्यार्थिनीच्या पालकांना एक लाख रुपये प्रकल्प कार्यालयाकडून व एक लाख रुपये संस्थेकडून देण्यात आले असल्याचे, तसेच नियमानुसार अधिकचे अनुदान मिळवून देण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे प्रभारी सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दखल घेतली असती तर...
अपघातानंतर अनेक गंभीर बाबी चर्चेत आल्या आहेत. संबंधित पाण्याची टाकी ही योग्य नसल्याची बाब विद्यार्थ्यांनी शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. शाळा निरीक्षकांनीही याकडे लक्ष वेधले होते. यादरम्यान शाळा प्रशासनातील काहींनी त्या पाण्याच्या टाकीला केवळ पांढरा चुना मारून वेळ मारून नेल्याचे सांगितले जात आहे.
शाळेने कळविलेच नाही
मृत सुमरतीच्या आई-वडिलांना घटनेची माहिती शाळा प्रशासनाकडून दिली गेली नव्हती, तर आपली मुलगी मृत्युमुखी पडल्याची माहिती बुधवारी अन्य कुणाकडून कळल्याचे तिच्या आई-वडिलांनी रुग्णालयात स्पष्ट केले.
इन कॅमेरा शवविच्छेदन
मृतक विद्यार्थिनीचे शवविच्छेदन इनकॅमेरा केले गेले. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दुपारी दोन वाजता हे शवविच्छेदन पार पडले.