आरोपींच्या पाठीराख्यांना अटक करा
By Admin | Updated: September 17, 2016 00:26 IST2016-09-17T00:26:26+5:302016-09-17T00:26:26+5:30
पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रमशाळेमध्ये झालेल्या ११ वर्षीय विद्यार्थी प्रथमेश सगणे

आरोपींच्या पाठीराख्यांना अटक करा
नरबळी प्रकरण : नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन
चांदूरबाजार : पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रमशाळेमध्ये झालेल्या ११ वर्षीय विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नागपंचमीच्या दिवशी नरबळी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ह्यदयाला हेलावून टाकणाऱ्या घटनेच्या विरोधात स्थानिक नागरिक सरसावले असून घटनेच्या दोषींवर व त्यांच्या पाठराख्या संस्थाचालकावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी तहसीलदाराला दिलेल्या निवेदनात केली आहे.
पिंपळखुटास्थित शंकर महाराज आश्रमशाळेत चिमुकल्या प्रथमेशचा गळा चिरून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक सुद्धा केली. मात्र, या आरोपींना प्रोत्साहित करणाऱ्यांना सुद्धा अटक करावी जेणेकरून या गरीब विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळल्या जाणारा खेळ बंद होईल तसेच राज्यातील अनेक आश्रमशाळेत अनेक बाबा व महाराजांचा सहभाग आहे. त्यांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच पिंपळखुटा येथे घडलेल्या घटनेची चौकशी गुप्तचर यंत्रणेकडून करून नरबळी प्रकरणातील आरोपींना प्रोत्साहीत करणाऱ्यांना सुद्धा अटक करावी व त्यांना कठोर शिक्षा व्हावी असे निवेदन तहसीलदार शिल्पा बोबडे यांना देण्यात आले. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष किशोर मेटे, राजू वानखडे, तुषार राऊत, प्रफुल रुईकर, चेतन खडसे, भूषण डवरे, प्रणव आमटे यांच्यासह अक्षय, नितेश, शुभम, गजू, अंकुश, प्रवीण, आकाश, संदी आदी अनेक नागरिक उपस्थित होते. जिल्ह्यात सर्वदुर नरबळी प्रकरणाची सिआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली असून तालुकास्तरावर तहसिलदार आणि अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सर्वसामान्य नागरिक सरसावले आहेत. (तालुका प्रतिनिधी)