शंकरबाबांच्या भेटीसाठी अर्चना कासाविस
By Admin | Updated: July 29, 2014 23:34 IST2014-07-29T23:34:41+5:302014-07-29T23:34:41+5:30
शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या अर्चनाला पाच पिशव्या रक्त चढविण्यात आल्यावर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तिला मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. १ मधून डिस्चार्ज

शंकरबाबांच्या भेटीसाठी अर्चना कासाविस
प्रकृतीत सुधारणा : जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज
अमरावती : शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या अर्चनाला पाच पिशव्या रक्त चढविण्यात आल्यावर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तिला मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. १ मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी शंकरबाबाजवळ जाण्याची तिची तळमळ पाहायला मिळाली.
२१ जुलै रोजी अर्चनाला जिल्हा सामान्य रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तिच्या शरीरातील रक्त कमी झाल्याने तिला रक्ताची आवश्यकता होती. त्यामुळे ‘लोकमत’ने रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यावेळी रक्तदात्यांची रीघ लागली होती. तिला ओ पॉझिटीव्हच्या पाच पिशव्या रक्त चढविण्यात आले. मागील आठ दिवसांपासून अर्चना रुग्णालयात उपचार घेत असताना तिला आपल्या घरची आठवण येत होती. वझ्झर येथील बालगृहात दररोज मुलं-मुली खेळतांना, बागळताना अर्चनाच्या दृष्टीस पडत होते. मात्र गेल्या आठ दिवसांत आपल्या जवळ कोणी नसल्याने तिच्या भावना अनावर झाल्याचे रुग्णालयातून सुट्टीच्या दिवशी दिसत होते. मंगळवारी रुग्णालयात तिला आठ दिवस पूर्ण झाल्याने तिला घरी जाण्याचे वेध लागले होते. २७ जुलैला तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी अर्चनाच्या मनात घरी जाण्याची तळमळ दिसून येत होती. ‘मुझे मेरे शंकरबाबा के पास जाना है’, अशी विनवणी वॉर्डन वर्षा काळे यांच्याकडे केली होती. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला आता सुट्टी देण्यात आली आहे.मंगळवारी दुपारी १ वाजता अर्चनाला रुग्णवाहीकेद्वारे वझ्झर नेण्यात आले.