जात पडताळणीसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST2020-12-17T04:39:33+5:302020-12-17T04:39:33+5:30
अमरावती : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन ...

जात पडताळणीसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणार
अमरावती : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) सर्व जिल्हा समित्यांना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्राप्त जात पडताळणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारावेत व हस्तलिखित अर्ज स्वीकारू नयेत, अशा सूचना आहेत. सद्यस्थितीत जात पडताळणी अर्ज केवळ ऑनलाईन प्रक्रियेद्वारे स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचाय निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनीही हीच पद्धती अवलंबण्याची सूचना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त सुनील वारे यांनी केली आहे.
आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ‘बार्टी’च्या संकेतस्थळावर अर्ज भरता येईल. ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्जाची प्रिंट काढावी. त्याचप्रमाणे, फॉर्म १५ ए वर जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने, कव्हरिंग लेटर, तसेच नमुना ३ मध्ये वंशावळ, नमुना २१ मध्ये सादर करावयाचे शपथपत्र आदी आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज समितीस सादर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
समितीस अर्जाची प्रत सादर करताना मास्क घातलेला असावा, एका अर्जासाठी केवळ एका व्यक्तीने उपस्थित राहावे, तसेच सोशल डिस्टन्स राखावे, असे आवाहन उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे.