अंत्योदय कार्डधारकांना महाराष्ट्र दिनाला मिळणार मोफत साडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 16:23 IST2025-04-15T16:22:47+5:302025-04-15T16:23:39+5:30
Amravati : 'अंत्योदय'च्या १.२८ लाख लाभार्थीना रेशन दुकानातून मिळणार लाभ

Antyodaya card holders will get free sarees on Maharashtra Day
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील १.२८ लाख अंत्योदय कार्डधारकांना यावेळी होळीला मोफत साडी मिळालेली नाही. मात्र, अन्य जिल्ह्यात साड्यांचे वितरण झाले. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थीमध्ये नाराजी होती. अखेर काही तालुक्यांमधील गोदामात साड्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे १ मे या महाराष्ट्र दिनापासून वाटपाचा मुहूर्त असल्याची माहिती आहे.
गतवर्षी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १,२८,२१२ अंत्योदय रेशन कार्डधारकांना प्रत्येकी एक साडी मोफत देण्यात आली होती. तसेच दरवर्षी एक मोफत साडी या लाभार्थी कुटुंबांना देण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात यावर्षी होळी आटोपली तरी रेशन दुकानातून साडी मिळालेली नव्हती. प्रत्यक्षात काही जिल्ह्यांत मात्र रेशन दुकानांतून मोफत साड्यांचे वितरण करण्यात आल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. आता मात्र काही तालुक्यांतील गोदामात साड्यांचा पुरवठा झालेला आहे. शिवाय, अन्य तालुक्यांतदेखील पुरवठा होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.
जिल्हा स्थिती
अंत्योदय रेशन कार्डधारक : १,२८,२०७
प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक: ३,७४,३३६
सणासुदीत आनंदाचा शिधा केव्हा ?
अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून १०० रुपयांत आनंदाच्या शिधाची किट देण्यात येत असते. गतवर्षी श्रीराम नवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आनंदाचा शिधा देण्यात आला होता. यंदा मात्र शासनाला आनंदाच्या शिधाचा विसर पडला आहे.
"अंत्योदय रेशन कार्डधारकांना एक मोफत साडी रेशन दुकानातून मिळणार आहे. यासाठी काही तालुक्यांतील गोदामात साड्या उपलब्ध झालेल्या आहेत. लवकरच त्याचे वितरण करण्यात येईल."
- निनाद लांडे, डीएसओ