४०४१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचा ‘आगाज’, बक्षिसांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:53 IST2018-01-06T18:53:33+5:302018-01-06T18:53:46+5:30
देशभरातील ४०४१ शहरांमध्ये ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. चार हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल येण्यासाठी शहरांमध्ये चुरस असून, सिटिझन फीडबॅकवर गुणांकन असल्याने सर्वसामान्य नागरिकच स्वत:चे शहर ‘स्वच्छ’ ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

४०४१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचा ‘आगाज’, बक्षिसांचा वर्षाव
प्रदीप भाकरे
अमरावती - देशभरातील ४०४१ शहरांमध्ये ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. चार हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल येण्यासाठी शहरांमध्ये चुरस असून, सिटिझन फीडबॅकवर गुणांकन असल्याने सर्वसामान्य नागरिकच स्वत:चे शहर ‘स्वच्छ’ ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ सर्वेक्षणाचे हे चौथे वर्ष असून सहभागी शहरांची संख्या तब्बल ४०४१ वर पोहोचली आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या क्वालिटी काऊंन्सिल ऑफ इंडियाची त्यासाठी नेमणूक करण्यात आली असून, या ‘क्यूसीआय’ने नेमलेल्या असेसर्सच्या पाहणीनंतर अंतिम गुणांकन होणार आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ ही परीक्षा चार हजार गुणांची असून, त्यात सेवास्तर प्रगती व नागरिकांच्या अभिप्रायासाठी प्रत्येकी १४००, तर थेट निरीक्षण या विभागासाठी १२०० गुण आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये महाराष्ट्रातील सर्व शहरांची कामगिरी उच्चतम होण्यासाठी राज्य सरकारने बक्षीसही घोषित केले आहे.
समाजातील सर्व घटकांतील लोकांचा सांघिक सहभाग वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणातील ४०४१ शहरे ‘अमृत’ व ‘नॉन अमृत’ अशा दोन गटांत विभागण्यात आले आहेत. अमृत शहरांचा गुणानुक्रम हा देशपातळीवरील ५०० शहरांमधून करण्यात येईल. यात राज्यातील ४३ शहरांचा समावेश आहे. नॉन अमृत शहरांची विभागणी पाच विभागांमध्ये करण्यात आली आहे. यात महाराष्ट्राचा समावेश पश्चिम विभागात आहे. ४ जानेवारीपासून सुरू झालेले स्वच्छ सर्वेक्षण १० मार्चपर्यंत चालणार आहे. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत