विश्वविक्रमाने वाढविला राष्ट्रीय महामार्गाचा धोका; नागझिरी फाट्यावर गिट्टीच-गिट्टी, दिशादर्शक फलक गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 14:49 IST2022-07-25T14:44:35+5:302022-07-25T14:49:49+5:30
Amravati-Akola Highway : नागझिरी फाट्यावर गिट्टीच-गिट्टी; दिशादर्शक फलक गायब, वाहनचालक बुचकळ्यात

विश्वविक्रमाने वाढविला राष्ट्रीय महामार्गाचा धोका; नागझिरी फाट्यावर गिट्टीच-गिट्टी, दिशादर्शक फलक गायब
बडनेरा (अमरावती) : अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गावरील विश्वविक्रमाने वाहनचालकांपुढील धोका पूर्वीपेक्षा अधिक वाढवून ठेवल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. नागझिरी फाटा अपघातप्रवण स्थळ बनले आहे. येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गिट्टी पडून आहे. दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालक बुचकळ्यात पडत आहेत.
कंपनीने केवळ विश्वविक्रमासाठीच धडपड केली का, अशा संतप्त प्रतिक्रिया या मार्गावरील धोकादायक स्पॉट ओलांडताना वाहनचालक तसेच रस्त्यालगतच्या गाव-खेड्यांवरील लोक बोलून दाखवित आहेत. विशेषत: नागझिरी फाटा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरतो आहे. येथे वळणावरच असणारी गिट्टी रात्रीच्या वेळी अपघातास कारणीभूत ठरत आहे. या ठिकाणी ना दिशा दर्शवणारे फलक आहेत, ना गिट्टी हटविण्यासाठी कुणाला वेळ आहे. गेल्या महिन्याभरापासून अशीच स्थिती आहे. नवख्या वाहनचालकांना त्याचा प्रचंड मनस्ताप झेलावा लागतो आहे.
नागझिरी फाट्यावरून राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. येथून वाशिम व अकोला अर्थात अनुक्रमे नांदेड व मुंबईकरिता वाहने काढली जातात. विश्वविक्रमी रस्ता ऊर्फ डांबरीकरणानंतर निर्माण झालेल्या येथील धोकादायक स्पॉटकडे लक्ष न दिल्यास मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. तेव्हा कुणाला जबाबदार धरणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
विश्वविक्रमाची अपेक्षा बाळगून असलेल्यांनी पावसामुळे मंदावणारे काम व त्यापासून होणारे धोकेदेखील लक्षात घ्यायला पाहिजे होते. तथापि, त्याकडे कुणी लक्षच दिलेले नाही.
लोणीत चार महिन्यांपासून ‘जैसे थे’
लोणी गावाच्या बस स्टॅन्डसमोर गेल्या चार महिन्यांपासून लोखंडी सळईचा ढाचा उभारला आहे. कामाला गती द्या, अशी नागरिकांची मागणी आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत असते. ते या सळाईच्या चौकोनाला वळसा घेत असताना स्टँडवर उभ्या असलेल्या ऑटोरिक्षा, बस यांना धडकण्याचा वा स्टँडवर उभा प्रवासी वा विद्यार्थी चाकाखाली येण्याची शक्यता हमखास होते. त्यामुळे प्रवाशांनी कुठे उभे राहायचे व वाहने कुठे उभी करायची, असा पेच निर्माण झाला आहे.