अन् कापूस, ऊस, कांद्याचे दर झाले जाहीर
By Admin | Updated: December 13, 2015 00:08 IST2015-12-13T00:08:06+5:302015-12-13T00:08:06+5:30
शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलन अंगार झाले होते. १९८० सालच्या १४ डिसेंबरचा तो दिवस. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सात लाख शेतकऱ्यांच्या सभेला शरद जोशी संबोधित करीत होते.

अन् कापूस, ऊस, कांद्याचे दर झाले जाहीर
श्रीकांत तराळ : मुख्यमंत्री अंतुलेही नमले; शरद पवार, यशवंतराव चव्हाणांना पोहऱ्यात अटक
अमरावती : शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलन अंगार झाले होते. १९८० सालच्या १४ डिसेंबरचा तो दिवस. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सात लाख शेतकऱ्यांच्या सभेला शरद जोशी संबोधित करीत होते. सभास्थळावरून हेलिकॉप्टर भिरभिरत होते. अर्ध्या सभेत जिल्हाधिकारी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी २० डिसेंबरला वाटाघाटीसाठी बोलविल्याचा निरोप त्यांनी दिला. सभा संपली. २० डिसेंबरला वर्षा बंगल्यावर वाटाघाटी सुरू झाल्यात. शरद पवारांची दिंडी अमरावती जिल्ह्यातील पोहरा जंगलात दाखल झाली होती. वाटाघाटीचा तासभराचा अवधी उलटतो न उलटतो तोच शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना एसटीबसमध्ये बसविले. राजकीय कारकिर्दीदरम्यान पहिल्यांदाच ते एसटी बसते बसले होते. त्यांना तुरुंगात रवाना करण्यात आले. तिकडे एकाचवेळी कापसाला ७००, काद्यांला १०० आणि ऊसाला ३०० रुपये हमीभाव घोषित झाला. देशाच्या इतिहासातील ते पहिले उदाहरण होते. शासनाने खरेदी केंद्रे सुरू करून खरेदीही आरंभली. वर्षा बंगल्यावरील त्या वाटाघाटीचे श्रीकांत तराळ साक्षीदार आहेत. शरद जोशी नावाच्या वादळाची सुरुवात ज्या काळात झाली त्याच काळात त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक संघर्षात समर्थसाथ देणाऱ्या तराळ यांनी गहिवरून ही आठवण लोकमतला सांगितली.
मराठ्यांचे पानिपत
साहेबांसोबत एकदा दौऱ्यावर होतो. प्रवासादरम्यान आम्ही पानिपतला पोहोचलो. रात्री दीड वाजले होते. पेंगत पेंगत आम्ही लक्झुरीतून उतरत होतो. सोबत विजय जावंधिया आणि भास्करराव बोरावसे हेदेखील होते. पायऱ्या उतरत असताना साहेंबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला नि म्हणाले, 'श्रीकांत पाऊल जरा जपून टाक. हे पानीपत आहे. मराठ्यांनी येथे चोपून मार खाल्ला होता' साहेंबांच्या त्या वाक्याने सर्वच खळाळून हसले. जांभई देत उतरतानाही त्यांची तल्लख विनोदबुद्धी अशी कार्यरत राहत असे. त्यांच्या अचाट वाचनाचा उपयोग ते जसा सरकारला नमवायला करीत असे तसाच तो वातावरण हलके फुलके करण्यासाठीही करायचे.
- आणि पत्रकारांनी वाजविल्या टाळ्या
७ डिसेंबर १९८० चा दिवस. शरद जोंशींच्या विदर्भ दौऱ्याची सांगता नागपुरात झाली. नागपूरच्या टीळक पत्रकार भवनात मी शरद जोशी यांची पत्रपरिषद आयोजित केली होती. त्याचवेळी शरद पवारांची पायी शेतकरी दिंडी जळगावहून निघालेली होती. पत्रकारांनी प्रश्न विचारला. पवारांच्या दिंडीबाबत आपले मत काय? शरद जोशी यांनी त्यावर दिलेले उत्तर मार्मिक होते. ते म्हणाले, एक जुना मुख्यमंत्री एका नवीन मुख्यमंत्र्याला मागून मागून काय मागेल? आणि त्या दिंडीत माझ्या शेतकऱ्यांना पायी चालावे लागणार आहे. त्यामुळे त्या दिंडीला ना माझा विरोध आहे ना माझे समर्थन. यावर पत्रकारांनी टाळ्या वाजविल्या.