तासभराचा भोजन अवकाश तरीही कामे सावकाश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST2022-02-24T05:00:00+5:302022-02-24T05:00:54+5:30
राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार शासकीय कार्यालयाचा पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्येही बदल केला. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते ६.१५, तर कार्यालयातील शिपायाकरिता ९.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित केली आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने आणि अधिकारी व कर्मचारी शासकीय काम महिनाभर काम या वृत्तीने काम करीत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे.

तासभराचा भोजन अवकाश तरीही कामे सावकाश !
जितेंद्र दखने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागताची संख्या मोठी असल्याने वर्दळ कमी होत नाही. दुपारी मात्र त्यांचे काम होत नाही. कारण दुपारी एक ते अडीच ते तीन वाजेपर्यंत लंच टाईम सांगितला जातो. त्यामुळे कामानिमित्त आलेल्यांना आल्यापावली परत जावे लागते किंवा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत वेळ घालवात बसावे लागत असल्याचे दिसून आले.
राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार शासकीय कार्यालयाचा पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्येही बदल केला. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते ६.१५, तर कार्यालयातील शिपायाकरिता ९.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित केली आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने आणि अधिकारी व कर्मचारी शासकीय काम महिनाभर काम या वृत्तीने काम करीत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे. मेळघाटसह गैरआदिवासी भागातून नागरिक तक्रारी, गऱ्हाणी, निवेदन, अर्ज घेऊन कार्यालयात येत असतात. परंतु, बरेचदा अधिकारी व कर्मचारी जागेवर उपलब्ध होत नाही. त्यांना विचारणा केली, तर जेवणाची वेळ आहे, असे सांगून मोकळे होतात. म्हणून पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात काढलेल्या आदेशांमध्ये भोजनाची वेळ दुपारी १ ते २ अशी करण्यात आली. या वेळेत केवळ अर्धा तासात भोजन अवकाश देण्यात आला आहे. परंतु जिल्हा परिषदेचे कर्मचारी तासभराहून अधिक वेळ भोजन अवकाशात घालवतात. यामुळे कामे सावकाश करताना दिसत आहेत.
कार्यालयीन वेळेत घरगुती कामाकडे लक्ष
- बऱ्याच विभागातील कर्मचारी लंच टाइममध्ये जेवण करण्याकरता घरी जातात. त्यामुळे अर्ध्या तासाऐवजी त्यांचे एक ते दीड तास तशीच निघून जातात. कार्यालय वेळेची बंधने येथे पाळली जात नसल्याचे चित्र आहे.
काय म्हणतो शासनाचा आदेश?
राज्य शासकीय कार्यालयातील भोजनाच्या वेळेबाबत शासनाने ४ जून २०१९ रोजी काढलेल्या आदेशानुसार अधिकारी व कर्मचारी करता कार्यालयीन वेळेत भोजनासाठी दुपारी १ ते २ वाजता अर्धा तासाची वेळ असावी, अशा सूचना आहेत.
कार्यालयीन वेळा सर्वांनी पाळल्याच पाहिजे, कार्यालय वेळेचा दुरुपयोग होत असेल किंवा भोजन अवकाशानंतर कर्मचारी उपस्थित राहत नसतील तर योग्य ती कारवाई केली जाईल.
- तुकाराम टेकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
सामान्य प्रशासन
मेळघाटसारख्या दुर्गम भागातून आल्यानंतर बरेचदा अधिकारी, कर्मचारी वेळेत भेटत नाही. हा प्रकार थांबला पाहिजे.
- कुलदीप काळबांडे, नागरिक