अमरावती जिल्ह्यात रोज सरासरी ६८ जणांना कुत्रे चावत असल्याची नोंद; ११ महिन्यांत २२,६६१ जणांना 'डॉग बाईट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:15 IST2025-12-15T18:14:47+5:302025-12-15T18:15:16+5:30
Amravati : जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल २२ हजार ६६१ नागरिकांना कुत्रा चावल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.

An average of 68 people are bitten by dogs every day in Amravati district; 22,661 people have been bitten by dogs in 11 months
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल २२ हजार ६६१ नागरिकांना कुत्रा चावल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाची ती आकडेवारी आहे.
यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी ६८ नागरिक कुत्र्याच्या चाव्याला बळी पडत आहेत. ग्रामीणसह अमरावती शहरातही मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढत चालला आहे. शहरातील अनेक चौक, वसाहती आणि मुख्य रस्त्यांवर दुचाकीस्वारांचा पाठलाग करून कुत्रे चावत असल्याच्या घटना घडत आहेत.
'कुत्र्यांपासून सावधान' ही पाटी हवी चौकाचौकात
घराच्या फाटकांवर असणारी 'कुत्र्यापासून सावधान' अशी पाटी शहरातील चौकांमध्ये लावण्याची गरज आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीज या जीवघेण्या आजाराचा धोका संभवतो. रेबीज हा विषाणूजन्य आजार असून तो मज्जासंस्थेवर परिणाम करतो. वेळेवर लस व उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो; मात्र दुर्लक्ष केल्यास रुग्ण कोमात जाण्याची किंवा मृत्यूची शक्यता असते.
इतर प्राण्यांच्याही १,८८१ घटना
कुत्र्यांबरोबरच मांजर, माकड, उंदीर व इतर जंगली प्राण्यांच्या चाव्याच्या घटनाही जिल्ह्यात घडल्या आहेत. या कालावधीत १,८८१ नागरिकांनी इतर प्राणी चावल्याने उपचार घेतले असून, यातही एकाच्या मृत्यूची नोंद आहे.
रेबीज म्हणजे काय ?
प्राण्यांच्या चाव्यामुळे पसरणारा रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर मेंदू व मज्जासंस्थेवर परिणाम करतो. ताप, अंगदुखी, पाण्याची भीती, स्नायू अशक्त होणे, मेंदू व मणक्यात सूज येणे अशी लक्षणे दिसतात.
कुत्रा चाव्यावरील सर्वाधिक उपचार जिल्हा रुग्णालयात
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, अकरा महिन्यांत जिल्हा सामान्य रुग्णालयात ९,८२९ नागरिकांनी कुत्र्याच्या चाव्यावर उपचार घेतले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आवश्यक रेबिज इंजेक्शन मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकही जिल्हा रुग्णालयात इंजेक्शनसाठी येत असल्याचे चित्र आहे.