अमरावती विद्यापीठाची हिवाळी-२०२० परीक्षा होणार ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 07:00 IST2021-04-27T07:00:00+5:302021-04-27T07:00:07+5:30
Amravati news Amravati University संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील नियमित विद्यार्थ्यांची हिवाळी-२०२० परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे.

अमरावती विद्यापीठाची हिवाळी-२०२० परीक्षा होणार ऑनलाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील नियमित विद्यार्थ्यांची हिवाळी-२०२० परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंसमवेत झालेल्या आभासी बैठकीत संकेत दिले आहेत. विद्यापीठ परीक्षांच्या अनुषंगाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मंगळवारी कुलगुरूंची बैठक घेणार आहेत.
विद्यापीठाने अगाेदर हिवाळी-२०२० परीक्षा २६ एप्रिलपासून घेण्याचे नियोजन चालविले होते. मात्र, कोरोना संसर्गाचा वाढता वेग लक्षात घेता, शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे या नियमित विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येतील, अशी तयारी चालविली आहे. या सर्व परीक्षा ऑनलाईन असणार आहे. त्यानुसार विद्यापीठाने अध्यादेश जारी केला आहे.
विद्यापीठाशी संलग्न २८२ महाविद्यालयांत सुमारे दोन लाख विद्यार्थी हिवाळी २०२० परीक्षा देतील, अशी माहिती आहे. ऑनलाईन परीक्षांसाठी परीक्षा केंद्र, हॉल तिकीट, कंट्रोल शीट, रोल नंबर आदी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेण्याबाबत महाविद्यालयांना अवगत केले आहे.
ऑनलाईन सुविधा नसणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करावी
गावखेड्यांतील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन परीक्षांच्या अनुषंगाने साधने नसल्यास, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे विद्यापीठाने महाविद्यालय व्यवस्थापन, प्राचार्यांना पत्राद्वारे कळविले आहे. हिवाळी-२०२० परीक्षांपासून नियमित प्रवेशित विद्यार्थी वंचित राहू नये, असे निर्देश देण्यात आले आहे. लॅपटॉप, डेस्कटॉप अथवा मोबाईलची व्यवस्था विद्यार्थ्यांना करून द्यावी, असे प्राचार्यांना कळविले आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नियमित विद्यार्थ्यांची हिवाळी-२०२० परीक्षांचे नियोजन सुरू आहे. या परीक्षांना सुमारे दोन लाख विद्यार्थी असून, महाविद्यालयांना ऑनलाईन परीक्षांबाबत कळविले आहे. कोरोना नियमावलींचे पालन करूनच परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे.
- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००