अमरावती विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर आता अंकित होणार आईचेही नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:27 IST2018-12-08T15:22:45+5:302018-12-08T15:27:15+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आता गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित असणार आहे.

अमरावती विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर आता अंकित होणार आईचेही नाव
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आता गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित असणार आहे. येत्या काळात पदवीवरही आईचे नाव असेल, असा निर्णय शुक्रवारी सिनेट सभेत घेण्यात आला. गजानन कडू यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर कुलगुरूंनी तसा निर्णय जाहीर केला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित करून वितरित केल्या आहेत. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद विद्यापीठांनीदेखील गुणपत्रिका, पदवीवर आईचे नाव अंकित करून विद्यार्थ्यांना सोपविल्या आहेत. मात्र, गुणपत्रिकेवर आईचे नाव असावे, या आशयाचा प्रस्ताव सिनेट सदस्य गजानन कडू यांनी सादर केला. प्रारंभी येत्या शैक्षणिक सत्रापासून ही बाब शक्य नसल्याची नकारघंटा परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांची होती. मात्र, या प्रस्तावाला विवेक देशमुख यांनी बळ दिले. अशातच भीमराव वाघमारे यांनीदेखील उडी घेतली. वादंग होऊ नये, यासाठी कुलगुरू चांदेकरांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, विवेद देशमुख यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या ‘गोलमाल’ भूमिकेवर जोरदार टीका केली. एखादा नवीन सदस्य धोरणात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रस्ताव दाखल करतो. मात्र, सदर सदस्याला बोलू न देता तो प्रस्ताव मंजूर झाल्याची बोळवण केली जाते, असा आरोप विवेक देशमुख यांनी केला. दरम्यान, परीक्षा अर्ज सुधारित करण्यासाठी विद्वत परिषदेसमोर हा विषय निर्णयार्थ आहे. याविषयी निर्णय होताच पदवी, गुणपत्रिकेवर वडिलांसह आईचे नावसुद्धा प्रकाशित होईल, असा ठाम विश्वास परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी सभागृहात दर्शविला. परीक्षा अर्जात आजमितीला एका कॉलममध्ये आईचे नाव आहे. त्यामुळे गुणपत्रिकांवर विद्यार्थ्यांना देणे शक्य असल्याचे भीमराव वाघमारे यांनी सांंगितले. कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी सिनेट सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक सत्रापासून गुणपत्रिकांवर आईचे नाव असेल, असा निर्णय दिला.
‘‘परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून तीन वर्षांनंतर पदवीवर आईचे नाव प्रकाशित असणार आहे. सिनेट सभेत झालेल्या निर्णयानुसार गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित करूनच विद्यार्थ्यांना ती दिली जाईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.